मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर आधारित सिनेमा 'ठाकरे' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मुंबईतल्या वडाळ्यातील आयमॅक्समध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सिनेमाचे निर्माते संजय राऊत, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यासह बाळासाहेबांची भूमिका निभावणारे अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं असल्याचं यावेळी खा. संजय राऊत यांनी सांगितलं.


महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.  खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'छातीत नाही, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते', 'ठाकरे'त दणकेबाज संवादांची पर्वणी
बाळासाहेबांवर जे चित्रपट आले त्यात मला बाळासाहेब दिसले नाही. बाळासाहेब आपल्यात आहेत, पुढच्या पिढीला ते दाखवायचे आहेत. माझ्यासारख्या अनुभव नसलेल्या माणसाला संपादक केलं, मी त्याआधी कधी अग्रलेख लिहिला नव्हता, असे संजय राऊत  यावेळी म्हणाले. 150 प्रसंग लिहिले त्यातले 60-65 दाखवू शकलो, असेही त्यांनी सांगितले. ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकचा सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले होते.

'ठाकरे' सिनेमाचे दोन्ही भाषेतील ट्रेलर हे वेगवेगळे असून दोन्ही ट्रेलरमध्ये बराच फरक आहे. हिंदीतील ट्रेलरमध्ये बेळगाव, मराठी चित्रपटांना न मिळणारे थिएटर, बाबरी  मुद्दा, मुंबई दंगल, भारत-पाकिस्तान क्रिकेट यावर प्रामुख्याने भाष्य करण्यात आले आहे तर मराठी ट्रेलरमध्ये दक्षिण भारतीय लोकांचा मुद्दा, उठाव लुंगी बजाव पुंगी, एअर इंडियाच्या विरोधात केलेलं आंदोलन, मराठी पंतप्रधान यासारखे मुद्दे बेधडक शैलीत घेण्यात आलेले आहेत.