मुंबई : 'सिंबा' सिनेमातील 'तेरे बिन नही लगता...' या गाण्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उच्च न्यायलायाच्या या निर्णयामुळे रोहित शेट्टी आणि धर्मा प्रॉडक्शन यांना दिलासा मिळाला आहे.
"याचिकाकर्त्यांनी न्यायालयात येण्यास बराच उशीर केला आहे. सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या काही तासांवर आल्यानं या सिनेमाच्या प्रिंट्स जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यामुळे आता पुन्हा सिनेमा एडिट करून त्यातून गाणं काढणं शक्य नाही", असं सुट्टीकालीन न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी स्पष्ट केलं. याचिकाकर्त्यांची 'तेरे बिन नही लगता...' हे गाणं प्रदर्शित न करु देण्याची मागणी फेटाळून लावली.
मात्र येत्या काळात या प्रकरणाचा निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजून लागल्यास नुकसान भरपाई मागण्याचा त्यांचा हक्क कोर्टानं अबाधित ठेवला आहे.
शुक्रवारी 28 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित 'सिंबा' या सिनेमात नुसरत फतेह अली खान यांचं प्रसिद्ध गाण 'तेरे बिन नही लगता...' याचं रिमिक्स वापरण्यात आलं आहे. मात्र या गाण्याचे मूळ कवी ख्वाजा परवेझ आणि नुसरत फतेह अली खान यांच्या वारसांनी त्यांच्या गाण्याचे मालकी हक्क दिलेल्या म्युझिक कंपन्यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आमच्याशी कोणताही करार न करता हे गाणं वापरण्यात आल्याचा दावा करत वोमॅड म्युझिक लिमिटेड आणि हरियानी म्युझिक यांनी सिंबाच्या निर्मात्यांविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.
यावेळी सिंबाच्या निर्मात्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी स्पष्ट केलं की, साल 1994 मध्ये 'सॉनिक' या कराची, पाकिस्तानस्थित कंपनीसोबत नुसरत फतेह अली खान यांचा त्यांनी गायलेल्या गाण्यासंबंधातील करार झालेला आहे. त्यामुळे याचिकाकर्ते या गाण्यावर आपला दावा सांगू शकत नाहीत.
मात्र याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार गाण्याचे बोल हे मूळ कवीच्या नावावर आहेत, ते गाणारा गायक त्यावर आपला हक्क कसा सांगू शकतो. मूळ कवी ख्वाजा परवेझ यांचा साल 1991 मध्ये या म्युझिक कंपनीसोबत करार केलेला आहे. त्यामुळे गाण्यातील मूळ शब्दांवर त्यांचाच मालकी हक्क आहे.