मुंबई : म्हाडा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला आहे. या प्रकरणाचा तपास करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली आहे. याबाबत समितीने पुणे सायबर पोलिसांना पत्र सुद्धा लिहिलं आहे. शिवाय परीक्षा केंद्रावर घडलेल्या गैरप्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आणलं आहे.


म्हाडाच्या विविध पदांसाठी जानेवारी-फेब्रुवारी 2022 महिन्यात परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात पार पडली. या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचं एमपीएससी समन्वय समितीच्या लक्षात आलं. याबाबत समितीने सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आणलं असून ते 5 आणि 9 फेब्रुवारी रोजीचं आहे.


या परीक्षा TCS या खासगी कंपनीने घेतल्या होत्या. TCS ने स्वतःचे ION परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर खासगी कॉम्प्युटर सेंटर आणि कॉलेज सेंटर दिले होते. त्यामुळे औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील डमी रॅकेटने उघडकीस आला, असा आरोप या समितीने केला आहे.


मुंबई, औरंगाबाद, नाशिक अमरावती आणि इतर ठिकाणी अनेक डमी उमेदवार हाय-टेक डिव्हाईससोबत आढळून आले. खासगी परीक्षा केंद्रावर अशा उमेदवारांच्या तपासणीची कोणतीही व्यवस्था नव्हती. म्हाडानेही तक्रार केल्यानंतर परीक्षांच्या शेवटच्या दोन दिवसांसाठी मेटल डिटेक्टर बंधनकारक केलं. परंतु त्याचा विशेष असा काही उपयोग झाला नसल्याचं समितीचे पदाधिकारी म्हणाले.


याव्यतिरक्त TCS ION सेंटर्स सोडून इतर खासगी परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे पुरावे सीसीटीव्ही फूटेज समितीकडे असल्याचे त्यांनी सांगितलं. औरंगाबादमधील मोरया इन्फोटेक या परीक्षा केंद्रात काम करणाऱ्या आयटी इंजिनिअरने समितीला तिथलं सीसीटीव्ही फूटेज पाठवलं आहे.


- पहिली क्लिप 5 फेब्रुवारीची असून त्यात विद्यार्थी आणि सुपरवायजर परीक्षा केंद्रात प्रवेश करताना दिसत आहेत, त्या दिवशी एका विद्यार्थ्याची परीक्षा नसतानाही त्याने अनधिकृतरीत्या  प्रवेश केला आहे.


- दुसरी क्लिप सुद्धा 5 फेब्रुवारीची असून ती परीक्षा केंद्राच्या आतमधील आहे. या क्लिपमध्ये सुपरवायजर आणि विद्यार्थ्यासोबत परीक्षा केंद्राचा मालक दिसून येत असून दुसऱ्या क्लिपमध्ये ते तिघे  सीसीटीव्ही बंद करुन कॉम्प्युटर सिस्टमसोबत छेडछाड करताना दिसून येत आहेत, सीसीटीव्ही बंद केल्यानंतर त्यांनी सिस्टम सोबत छेडछाड करुन सॉफ्टवेअर आणि त्यांना हवे ते बदल केल्याची शक्यता आहे. 


- तिसरी क्लिप 9 फेब्रुवारी 2022 रोजीची असून या दिवशी याच विद्यार्थ्याची परीक्षा त्या परीक्षा केंद्रावर होती. सिस्टीमसोबत छेडछाड केलेल्या विद्यार्थ्याचा अनुक्रमांक तिसऱ्या/चौथ्या हॉलमध्ये आलेला असतानाही त्याला सहाव्या हॉलमध्ये मॅनेज केलेल्या त्याच कॉम्प्युटरवर परीक्षेसाठी बसवण्यात आल, जे दुसऱ्या क्लिपमध्ये दिसलं होतं. या क्लिपमध्ये सुपरवायजर  विद्यार्थ्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसलेला असून त्याला परीक्षेसाठी मदत करुन वार्तालाप करत असल्याचे आपण बघू शकतो.


फक्त TCS ION ची अधिकृत परीक्षा केंद्र द्यावी अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने आधीपासून केली होती. परंतु ION  केंद्रासोबतच खासगी कॉम्प्युटर सेंटर आणि कॉलेज परीक्षा केंद्रे म्हणून दिल्याने हा सर्व घोटाळा झाला आहे, त्यामुळे किती खासगी कॉम्प्युटर सेंटर्स अशा प्रकारे मॅनेज झाले असतील हे सांगणं कठीण आहे. म्हाडाने जवळ-जवळ प्रत्येक जिल्ह्यात अशी खासगी परीक्षा केंद्र दिली होती, त्यामुळे अंतिम निकाल लागण्याच्या आधी या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे, असं समितीचे म्हणणं आहे.