मुंबई :  राज्याच आणि विशेष म्हणजे राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पोलीस यंत्रणांमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सध्याची अशीच एक माहिती समोर आली असून, मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. याच अनुषंगाने मुंबईमध्ये एकूण 86 अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या ज्यात 65 अधिकारी हे मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत.


मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी क्राइम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर देण्यात आली आहे. तर, काहींची साईड ब्रांचमध्ये बदली दाखवण्यात आली आहे. 


क्राइम इंटेलिजन्स युनिटचे अधिकारी आणि सचिन वाझे निकटवर्तीय मानले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज काझी यांना सशस्त्र पोलीस दल या विभागात बदली देण्यात आली आहे, तर क्राइम इंटेलिजन्स युनिटचेच प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.


क्राइम ब्रांचमध्ये गेल्याकाही वर्षांपासून असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षकपदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुकेश अंबानी प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिसांवर प्रशचिन्ह उपस्थित झालं होतं.


वाझे प्रकरणानंतर नवीन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनीच क्राईम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल करत 28 पोलूस निरिक्षक, 17 सहायक पोलीस निरिक्षक आणि 20 पोलीस उप निरिक्षकांची बदली केली,  तसच इतर 21 अधिकाऱ्यांची ही बदली केली गेली आहे.


वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता विशेष म्हणजे क्राइम ब्रांचची, ही प्रतिमा बदलावी यासाठी 5 वर्षांहून जास्त काळ मुंबईत काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली केली गेल्याचं सांगितलं जात आहे. 


तसंच, या नंतर आता नवीन आयुक्त 5 वर्षाहून जास्त मुंबईत काम करणाऱ्या पोलीस उपायुक्तांचीही बदली करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून काही मोठे फेरबदल मुंबई पोलीस दलात पाहायला मिळू शकतात.


Exclusive : पोलिसांच्या बदल्यांमागील गौडबंगाल काय? एबीपी माझाच्या हाती 'तो' गोपनीय अहवाल


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांची होमगार्ड  विभागामध्ये बदली करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस महासंचालक असलेले हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. आपला कारभार सांभाळताच हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्यामध्ये पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यावर विशेष भर दिला.


क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचीच इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर का करण्यात आली. क्राईम ब्रांच हा मुंबई पोलीस दलातील एक महत्वाचा भाग मानला जातो. काय आहे क्राईम ब्रांचचा इतिहास आणि का क्राइम ब्रांचचं इतकं महत्त्व आहे जाणून घेऊया.



  • 1980 आणि 90 च्या दशकात जेव्हा मुंबईमध्ये अंडरवर्ल्डचं सावट होतं. त्यावेळेस क्राईम ब्रांच उदयास आलं.

  • क्राइम ब्रांचच मुख्य काम घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावणं, गुन्हेगारांना आटोक्यात ठेवण होतं.

  • यासाठी क्राइम ब्रांचमध्ये हुशार, धाडसी आणि खबऱ्यांचं नेटवर्क मजबूत असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत होती.

  • मुंबईमध्ये 94 पोलीस स्टेशन्स आहेत. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती.

  • मात्र, घडत असलेल्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि त्या गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी क्राइम ब्रांचकडे होती.

  • त्यावेळी क्राइम ब्रांचकडून गुंडांचे अनेक एन्काऊंटर करण्यात आले. त्यामुळे पहिल्यांदा क्राइम ब्रांच वादाच्या भोवर्‍यात आली.

  • एका टोळीकडून पैसे घेऊन दुसऱ्या टोळीतील गुंडांना मारत असल्याचे आरोप क्राईम ब्रांचवर लागले.

  • तसेच मटका, बेटिंग, बारवाल्यांकडून वसुली. तर ड्रग्स सिंडीकेट, बिल्डर लॅाबी यांच्याकडूनही खंडणी घेत असल्याचे आरोप पोलीस खात्यात काही अधिकाऱ्यांवर लावले गेले.

  • अनेक क्राईम ब्रांच अधिकारी कोट्यावधी संपत्तीचे मालकही झाले. त्यात प्रामुख्याने एकांऊटर स्पेशलिस्टची नावं आहेत.

  • सचिन वाझे हे सुद्धा 2004 मध्ये सस्पेंड होण्यापूर्वी क्राईम ब्रांचचा भाग होते. सचिन वाझे यांनी 63 एन्काऊंटर केलं आहेत.

  • ख्वाजा युनूस एन्काऊंटर प्रकरणी वाझे यांना सस्पेंड करण्यात आलं आणि 2020 मध्ये पोलीस दलात वाझे यांना पुन्हा घेतलं गेल.

  • मात्र, सेवेत रुजू झाल्यानंतर मुंबईमध्ये घडत असलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या केसचा तपास सचिन वाझेंकडेच सोपवण्यात येत होता. ज्यावर सुद्धा प्रश्न निर्माण झाले.

  • तर सचिन वाझे यांनी या कटात आपल्या पदाचा आणि पोलीस यंत्रणा विशेष करून क्राइम ब्रांचचा गैररित्या फायदा उचलला.

  • येणाऱ्या दिवसात सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्तांच्या बदल्यासुद्धा मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता आहे. यासाठी आज पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चाही केली. 


मुंबई पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलेल्या या बदल्या फक्त ट्रेलर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जर ट्रेलर इतका मोठा असेल तर पिक्चर आणि त्याचा शेवट कसा असेल हे पाहणं औत्सुक्याच असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात मुंबई पोलीस दलात अजून मोठे फेरबद्दल होतील हे मात्र निश्चित आहे.