मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. रश्मी ठाकरे यांनी 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. 


20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्वीट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान यापूर्वी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी आदित्य ठाकरे आणि आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे. 


मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी, 20 मार्च रोजी 2 हजार 982 रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी तब्बल 3,775 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 


मुंबईतील हे विभाग आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट  


मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे, या विभागात महापालिकेकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. 


आज दिवसभरात राज्यात 28 हजाार 699 कोरोना बाधित


मंगळवारी दिवसभरात हाती आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा सर्वांसमोर आणला. 'राज्यात आज 28,699 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आणि आज नवीन 13165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2247495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 230641 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे', असं त्यांनी ट्वीट करत सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :