Maharashtra Vidhimandal Assembly Session : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Maharashtra Vidhimandal Session) शेवटचे दोन दिवस उरले आहे. आज आणि उद्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याचाही सस्पेन्स कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल  सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार का याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे. तर, भाजप विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.


 महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून आज (सोमवारी) निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं.  


विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिलाय. त्यांनी लवकर मंजूरी द्यावी, यासाठी त्यांची भेट घेतलीय. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा, अशीही त्यांना विनंती करण्यात आली आहे. ते हा कार्यक्रम मंजूर करतील अशी आम्हाला खात्री आहे, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं होतं.  


मंगळवारी अधिवेशनांचे सूप वाजणार


मंगळवारी अधिवेशनांचे सूप वाजणार आहे, आज विधिमंडळात राज्यातील कायदा सुव्यव्सथा यावर विरोधक आक्रमक होणार आहेत. आज सर्वाचे लक्ष लागले आहे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार का? राज्सपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम प्रस्ताव यावर स्वाक्षरी करून विधीमंडळाकडून पाठवतात का याकडे लक्ष आहे. काल महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी राज्सपाल यांची भेट घेतली होती. आता राज्सपाल यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. भाजपाचे बारा निलंबित आमदारकी मागे घेणे त्याचवेळी अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणे यासाठी महाविकास आघाडी नेते आणि भाजपा नेते यांच्यात राजकीय चर्चा  सुरू झाल्यात यात काय तोडगा निघतो याकडं लक्ष आहे.  


विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, कोरोना काळात भ्रष्टाचार, महिला अत्याचार यावरुन सरकारला घेरतील अशी शक्यता आहे.  दुसरीकडे विधान परिषदेत अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक यावर लक्षवेधी आहे. तसंच अंतिम आठवडा प्रस्ताव, राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्न, गुन्हेगारी, माजी मंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात नाव यासह अनेक मुद्दे विरोधी पक्ष नेते विधान परिषदचे प्रवीण दरेकर बोलणार आहेत.


राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 32 जणांना कोरोना


राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 200 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha