मुंबई :  विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session)पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित


राज्यपालांना दिलं निवेदन


या निलंबित 12 आमदारांनी यानंतर राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना एक निवेदनही दिलं आहे.  ठाकरे सरकारच्या या दडपशाही निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असल्याचं आमदारांनी सांगितलं. आम्हाला बोलू द्या अशी मागणी केली असताना भाजप आमदारांवर शिविगाळ केल्याचा खोटा ठपका ठेवत निलंबित केलं असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. भाजपच्या आमदारांनी अशा प्रकारची शिविगाळ केलेली नाही. तरीही लोकशाहीच्या प्रथा, परंपरा गुंडाळून लोकशाहीचा गळा घोटून महाविकास आघाडीकडून सभागृहाचे कामकाज चालवले जात आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. आमच्यावर केलेले आरोप आम्हाला अमान्य असून उलट महाविकास आघाडीच्या सदस्यांनीच आमच्यावर हातापाई केली असल्याचंही यात म्हटलं आहे. 


12 विरुद्ध 12...! संघर्ष शिगेला... एकीकडं राज्यपाल नियुक्त 12 आमदार निवडीची प्रतीक्षा तर दुसरीकडं 12 आमदारांचं निलंबन


ठाकरे सरकारची तालिबानी वृत्ती- भाजप आमदार आशिष शेलार
याबाबत बोलताना भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, विधानसभा सभागृहाची आयुध गोठवणे, तारांकित प्रश्न व्यपगत करणे, हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न देणे, याबाबत संताप व्यक्त करणारे भाजपा सदस्य जेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले त्यावेळी त्यांना मागे आणण्यासाठी गेलो असताना, अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची शिविगाळ झालेली नसताना, उलट तालिका अध्यक्षांची क्षमा मी पक्षाच्यावतीने स्वतः मागितली असतानाही मला सस्पेंड केले गेले . ही ठाकरे सरकारची तालिबानी वृत्ती आहे, असं शेलार म्हणाले.


विधानसभेत जेव्हा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचा ठराव मांडला त्यावेळी त्यामध्ये असणाऱ्या तृटी दाखवून ओबीसी समाजाचे  नुकसान होऊ नये म्हणून मी हरकतीचा मुद्दा मांडून बोलू इच्छित होतो पण त्यावर बोलू दिले नाही. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी जे विधान केले त्याबद्दल हरकत घैऊ इच्छित असताना तालिका अध्यक्षांनी बोलू दिले नाही. पंतप्रधान पद आणि नरेंद्र मोदी यांच्या विषयी गैरसमज पसरवणारी विधाने मंत्र्यांनी केली ती कामकाजात राहू नये ही बाब लक्षात आणून देण्यासाठी बोलू द्या अशी मागणी मी वारंवार करीत होतो. पण आमदारांना बोलू न देता लोकशाहीचा गळा घोटला जात असताना ओबीसी समाजाचे आरक्षणावरुन नुकसान होईल असे सभागृहाच्या पटलावर येत होते म्हणूनच भाजपाचे काही आमदार आक्रमक झाले. तालिका अध्यक्षांकडे आम्हाला बोलू द्या अशी मागणी करीत अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहचले. त्यांना मी मागे घेण्यासाठी गेलो हे सभागृहात सर्वांनी पाहिले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात सुध्दा आम्हाला बोलू द्या अशी मागणी आमदार करीत होते. पण त्यांचे म्हणणे ऐकले नाही.  आम्ही कोणत्याही प्रकारची शिविगाळ केलेली नाही. पण तालिका अध्यक्षांना शिविगाळ केली असे वाटले तेच ग्राह्य धरुन आम्हाला सस्पेंड केले, असं शेलार यांनी म्हटलं आहे.