मुंबई : महाराष्ट्रातील पावसानं जरी दडी मारली असली तरी राजकीय वातावरणात मात्र जोरदार वादळं सध्या पाहायला मिळत आहेत. निमित्त आहे सध्या सुरु असलेल्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाचं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आहे. 12 आमदारांच्या निलंबनामागची वास्तविक कारणं किंवा तांत्रिक मुद्दे काहीही असले तरी त्यामागचे 'राजकीय' कंगोरे मात्र अनेक असल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवडीसाठी महाविकास आघाडीनं आपली सर्व शक्ती पणाला लावलीय मात्र राज्यपालांकडून यावर अद्याप तरी काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशात विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झाल्यानं राजकीय वर्तुळात 12 विरुद्ध 12 अशा आकड्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. आता निलंबित 12 विरुद्ध राज्यपाल नियुक्त 12 अशी आकड्यांची गणित भविष्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित


महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल संघर्ष 


महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेच. त्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरून तर रान पेटलं आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन 8 महिने होतील तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. जाणकारांच्या मते राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राज्यपालांना स्वताच्या मर्जीतली नावं देता येत नाहीत. त्यांना फक्त सरकारनं दिलेल्या यादीवरच निर्णय घ्यायचा असतो. नावं पसंत नसेल तर ते फेटाळण्याचा अधिकार मात्र त्यांना आहे. त्यामुळे आपल्या मनाची यादी देऊ शकत नसले तरी सरकारची यादी मात्र निकषावर तपासून ते अडकवू शकतात, असं जाणकार सांगतात. 


MPSC : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा


महाविकास आघाडीकडून पाठवलेली 12 नावं
काँग्रेस
1) सचिन सावंत 
2) रजनी पाटील  
3) मुजफ्फर हुसैन  
4) अनिरुद्ध वनकर 


राष्ट्रवादी काँग्रेस
1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी 
3) यशपाल भिंगे  
4) आनंद शिंदे 


शिवसेना
1) उर्मिला मातोंडकर  
2) नितीन बानगुडे पाटील 
3) विजय करंजकर  
4) चंद्रकांत रघुवंशी 


भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन 
आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपने बहिष्कार टाकला.