मुंबई : भीमा कोरेगाव, शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांचं 84 व्या वर्षी निधन झालं आहे. होली फॅमिली रूग्णालयात आज दुपारी 1:30 वाजता घेतला अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून तब्येत खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र जामीन मिळण्याआधीच त्यांचं रुग्णालयात निधन झालं. 


मुंबई उच्च न्यायालयात फादर स्टॅन स्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी ही माहिती न्यायालयात दिली. न्या.एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने दुपारी अडीचच्या सुमारास स्टॅन स्वामी यांच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान त्यांचे वकील मिहिर देसाई म्हणाले की, तुरूंगात फादर स्टॅन स्वामी यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना काही बोलायचे आहे.


होली फॅमिली हॉस्पिटल मुंबईचे डॉ. डिसूझा म्हणाले की, "फादर स्टॅन स्वामी यांचे निधन झाले आहे. स्टॅन स्वामी यांना होली फॅमिली हॉस्पिटल मुंबई येथे उपचारासाठी दाखल केले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र त्यांचं निधन झालं. 


कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्टॅन स्वामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, "फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाबद्दल संवेदना व्यक्त करतो. ते न्याय आणि मानवतेस पात्र होते.






राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्टॅन स्वामी यांना ऑक्टोबर 2020 मध्ये अटक केली होती आणि तेव्हापासून ते तळोजा तुरूंगात होते. 28 मे रोजी कोर्टाच्या आदेशानंतर स्वामींवर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. खासगी रुग्णालयात त्याच्या उपचाराचा खर्च त्याचे सहकारी व मित्र करत होते.


शनिवारी त्यांचे वकील मिहिर देसाई यांनी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाला सांगितले की, स्वामींची प्रकृती चिंताजनक असून ते अद्याप रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत. वैद्यकीय कारणास्तव स्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी खंडपीठाने मंगळवारी पुढे ढकलली आणि त्यांना तोपर्यंत रुग्णालयातच ठेवण्यास सांगितले होते.