मुंबई: अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी 8127 मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
निरंजन डावखरे यांना 32 हजार 831 तर संजय मोरे यांना 24 हजार 704 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
23 तासांनी निकाल
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला गुरुवारी 28 जूनला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली होती. मात्र मतपत्रिकांचा घोळ, उमेदवारांचा आक्षेप यावरुन मतमोजणीत वारंवार खंड पडत गेला. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी पावणे सातच्या सुमारास म्हणजेच जवळपास 23 तासांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला.
मतदारांचा घोळ
मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने तब्बल 2500 मतं अवैध ठरवली.
कोकण पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या पसंतीची मतं शिवसेनेला म्हणजे यादीतील तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला द्यायची होती. तर काही मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारापुढे 3 आकडा लिहिला. ही मतं बाद करु नये , ग्राह्य धरण्यात यावी म्हणून शिवसेनेनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. ही मतं ग्राह्य धारावी नाहीतर निकाल जाहीर करु नका, अन्यथा कोर्टात जाऊ, असं पत्र शिवसेनेने लिहिलं.
मात्र निवडणूक आयोगाने आज सकाळी निकाल जाहीर केला.
निरंजन डावखरेंची आघाडी
या मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. मात्र त्यांची आघाडी मोठी नव्हती. पहिल्या फेरीत एक-दीड हजार, दुसऱ्या फेरीत तीन हजार आणि तिसऱ्या फेरीत साडेपाच हजार मतांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी कायम ठेवत विजय संपादित केला.
यश अपेक्षित होतं आणि ते मिळालं, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, प्रत्येक दिवशी डावखरे साहेबांची आठवण येते, अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली.
कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस
विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत असताना सगळ्यात चुरशीची असलेली निवडणूक म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे गद्दाराला धडा शिकवा या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांना पक्षात आणल्याने भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची होती. शिवसेनाही या निवडणुकीत तयारीनिशी उतरली होती.
कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार
भाजप : निरंजन डावखरे - विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला
शिवसेना : संजय मोरे
संबंधित बातम्या
LIVE विधानपरिषद निकाल : भाजपाचे निरंजन डावखरे विजयी
मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना, तर शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील विजयी