Uhasnagar Municipal corporation  :  सफाई कामगारांच्या माध्यमातून चेंबर साफ केले जाते. पण सफाई करताना दुर्घटना झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावरच उल्हासनगर महापालिकेकडून भन्नाट प्रयोग करण्यात आला आहे. चेंबर साफ करण्यासाठी चक्क रोबोटचा वापर करण्यात आला आहे. असा प्रयोग करणारी उल्हासनगर महापालिका पहिलीच महापालिका आहे. 


उल्हासनगर महापालिका क्षेतात रोबोट सफाईचे काम करत आहे. उल्हासनगर महापालिकेच्या एकूण चार प्रभागातील सफाई हा रोबोट करत आहे. पाच कर्मचाऱ्यांचे काम हा एकटा रोबोट करतो. सलग चार तास काम करतो. तसेच कामगारांमार्फत एक चेंबर साफ करतांना साधारणतः दोन ते तीन तास लागतात, ते काम हा रोबोट फक्त एक तासात करतो. सध्या महापालिकेकडून दोन रोबोट सफाई करत आहेत. यामध्ये अजून दोन रोबोट दाखल होणार आहेत. हा रोबोट कसं काम करतो आणि काय तांत्रिक बाबी आहेत.  


उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी या रोबोट प्रयोगाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कामगारावर होणाऱ्या मानवीय प्रथेला कुठेतरी चाप बसेल. कारण हा जो कचरा, घाण असते, वासही भयंकर येतो.  त्या घाणीमध्ये जाऊन हे कामगार हाताने ते गाळ आणि कचरा बाहेर काढतात. त्यावेळी अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळेच या यंत्राची गरज आम्हाला भासली आणि आम्ही प्रयोग म्हणून हे यंत्र महानगरपालिका क्षेत्रात आणले आहे. असा प्रयोग करणारी उल्हासनगर महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका असेल. ज्यांनी रोबोटच्या मार्फत ड्रेनेज लाईन तसेच चेंबर साफ करण्याचं काम सुरू केलं आहे.  या रोबोटद्वारे ड्रेनेज साफ करण्याचं काम अगदी जलद गतीने होत आहे. तसेच यासाठी कामगारही कमी लागतात, या मशीनद्वारे होणाऱ्या साफसफाईमुळे कामगारांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवत नाही.


सफाई कामगार हे ड्रेनेज लाईनमध्ये उतरुन साफसफाईचे काम करतात. यामध्ये अनेकदा अपघात होऊन त्यांच्या मृत्यूही होतो. अशी अनेक उदाहरण आपल्या राज्यात आहेत. आता नुकतच पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार चेंबरमध्ये उतरून साफसफाईचं काम करत असताना श्वास गुदमरून मृत्यू पावला. यासारख्या अनेक घटना राज्यात घडलेल्या आहेत. त्यामुळेच उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर तसेच आयुक्त अजीज शेख यांची बैठक झाली. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की उल्हासनगर महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम तसेच ड्रेनेज लाईनही जलद गतीने साफसफाई व्हावी, या हेतूने हा रोबोटचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता प्रत्यक्षात हा रोबोट रस्त्यावर उतरून ड्रेनेजमध्ये घुसून साफसफाईचा काम करत आहे.  


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात रोबोट गेल्या काही महिन्यापासून साफसफाईचं काम करतोय. या रोबोटचा परिणाम सकारात्मक असल्याने पालिका अजूनही रोबोट आणण्याचा तयारीत आहे. मात्र प्रत्येक नगरपालिकेने या रोबोटचा प्रयोग करायला हवा. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही, असे जमीर लेंगरेकर यांनी सांगितलं.