Maharashtra Politics:  काही दिवसांपूर्वीच सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) ठाकरे गटात (Uddhav Thackeray Group) प्रवेश केला अवघ्या काहीच दिवसांत उद्धव ठाकरेंचा आवाज बनल्या पण याच सुषमा  अंधारेंमुळे ठाकरेंच्या महिला आघाडीत प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे. सुषमा अंधारेंनी मात्र याबाबत बोलताना महिला आघाडीमध्ये कुठलीही नाराजी नसून ही भाजपकडून पिकवलेली कंडी असल्याचं म्हटलं आहे. 


नीलम गोऱ्हे, प्रियंका चतुर्वेदी, मनिषा कायंदे, उर्मिला मातोंडकर आणि आता सुषमा अंधारे. पक्षात एकामागे एक महिला नेत्या येत गेल्या आणि त्याचं वजन आपोआप वाढत गेलं. कुणी खासदार झालं तर कुणी आमदार झालं. उद्धव ठाकरेंचा हात ज्यांच्या डोक्यावर पडला त्याचं भलं झालं.  पण याचमुळे तळागाळात काम करणारी महिला आघाडी मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे. बाहेरून आलेल्यांना पक्षात मिळालेलं स्थान हे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या महिला आघाडीसाठी त्रासदायक होत आहे.  


महाराष्ट्रात महिला आघाडीची जाळं मोठं


महाराष्ट्रात महिला आघाडीची जाळं मोठं आहे.  मुंबई असो किंवा महाराष्ट्र सगळ्या आंदोलनात महिला आघाडी मोठ्या संख्येनं सहभागी होते.  पण हिच महिला आघाडी सुषमा अंधारेंच्या निमित्तानं नाराज असल्याची चर्चा आहे.  सुषमा अंधारेंसाठी यंदाचा दसरा मेळावा तसा पहिलाच होता. पण याच मेळाव्यात अंधारेंना भाषणांची संधी देण्यात आली, दुसरीकडे महाप्रबोधन यात्रेचीही अंधारेंवर जबाबदारी दिली गेली. यानंतर अंतर्गत कुजबुज तर सुरु झालीय पुढील काही दिवसांत महिला आघाडी उद्धव ठाकरेंकडे अंधारेंच्या विरोधात तक्रार करायच्या तयारीत आहे.


उपनेते पदावरून देखील महिला आघाडीत कुरबुर
सुषमा अंधारेंची आधीची वादग्रस्त वक्तव्यं. नुकत्याच एका सभेमध्ये महापुरुषांबद्दल काढलेले उद्गार, यामुळे पक्षाच्या अडचणीत अधिक वाढ होऊ लागलीय. ठाकरेंच्या सेनेत शिस्त आणि पक्षबांधणी महत्वाची मानली जाते. अंधारेंना यांना पक्षात येताच उपनेते पद दिलं गेलं. ठाकरेंच्या पक्षात उपनेते पदाला मोठा मान आहे. या उपनेते पदावरून देखील महिला आघाडीत कुरबुर सुरु आहे. 
 
याआधी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवलं.  मनिषा कायंदे आणि निलम गोऱ्हेंना विधानपरिषदेसाठी संधी दिली तर महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचं नाव होते.  


पक्षात बाहेरुन आलेल्या रेड कार्पेट दिलं जातं अशी भावना कार्यकर्त्यांची झालीय. पक्षात आता बंडखोरी झालीय, त्यामुळे पक्षात इनकमिंग सुरु झालंय. प्रत्येकालाच संधी हवीय. ठाकरेंसाठी काही तरी करून दाखवायचंय. पण आता ठाकरे यांनी कोणाला संधी द्यायची हे त्यांना ठरवावं नाहीतर भविष्यात महिला आघाडीत बंडखोरी झाली तर नवल वाटायला नको.