Ram Kadam News: भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी एक अनोखी शपथ घेतलीय. ती आपल्या मतदारांसाठी. मतदारांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, अशी शपथ राम कदम यांनी केली आहे. मतदारसंघातील डोंगराळ भागातील नागरिकांना जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा एक फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांना देखील टॅग केलं आहे.
घाटकोपर परिसरातील डोंगराळ भागात पाणी पुरवठा होत नसल्याने स्थानिक भाजपा आमदार राम कदम यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून महापालिका अधिकाऱ्यांसोबत सातत्याने ते बैठका घेत आहेत. त्यामुळे घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गी लागणार का? आणि भाजपा आमदार राम कदम हे केस कटिंग करणार का? अशा विविध प्रश्न आता चर्चेला आले आहेत.
दरम्यान राम कदमांच्या ट्वीटवर काही नागरिकांनी कमेंट देखील केल्या आहेत. नितीन जाधव यांनी म्हटलं आहे की, घाटकोपरमधील जनता ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देते, त्यांनी दुर्लक्ष केले आहे. आज डोंगराळ भागातील लोकांना पाणी पुरवठा करून काही लोक करोडपती झाले आहेत. आज प्रति महिना 240 रुपये प्रति महिना पाण्याचे पैसे भरूनही मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही ही मोठी समस्या आहे, असं जाधव यांनी कदमांना उत्तर देताना म्हटलं आहे.
तर अनेकांनी कदम यांच्या या प्रतिज्ञेचं समर्थन केलं आहे. संदीप गिरकर यांनी म्हटलं आहे की, "पाणी" या एकाच मुद्याभोवती घाटकोपर आणि पार्कसाईटचे राजकारण चालते. परंतु सदर मुद्याला कायमस्वरूपी मार्गस्थ लावण्यासाठी आपण घेतलेल्या भीष्मप्रतिज्ञेला संपूर्ण पाठिंबा आहे, असं गिरकरांनी म्हटलं आहे.