Maharashtra Thane Crime News : वडिलांसह मुलीनं राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील आसनगावात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव नमूद केल्यानं ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. विकास केदारे (36) आणि मुलगी आर्या केदारे (11) असे आत्महत्या करणाऱ्या बाप लेकीचं नावे आहेत. 


पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी कारागृहात


मृतक विकास केदारे हे कुटुंबासह शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरात राहत होते. त्यातच 15 ऑगस्ट 2021 रोजी मृत विकासची पत्नी मोनाली हीनं घरातच कीटकनाशक औषध प्राशनकरून आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांनी पत्नीच्या आत्महत्येला पती विकास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून विकास आणि त्याची वयोवृद्ध आई या दोघांना मोनालीच्या आत्महत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर तपास अधिकाऱ्यानं दोघांना न्यायालयात हजर केलं असता मृतक विकास आणि त्यांच्या वयोवृद्ध आईला कारागृहाची शिक्षा सुनावली होती. त्यातच जानेवारी महिन्यात विकास कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये आपण काही गुन्हा केला नसताना देखील माझ्यावर खोटा आरोप करून पोलीस अधिकाऱ्यानं मला खूप त्रास दिला. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचं सुसाई़ड नोटमध्ये नमूद करून मंगळवारी बाप-लेकीनं घरातच गळफास लावून जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केलं होतं.




सुसाईट नोट प्रकरणी पोलीस तपास सुरु 


काल (बुधवारी) मृत विकासाच्या नातेवाईकांनी शहापूरचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांची भेट घेऊन बाप-लेकीच्या आत्महत्येसह कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी लेखी तक्रार दिली आहे. तर बाप लेकीच्या आत्महत्येच्या मागचे नक्की कारण काय? याबाबतचा शहापूर पोलीस तपास करत असल्याची माहिती डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.