मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परप्रांतिय मजुरांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर तिथल्या सरकारची परवानगी घ्यावे लागेल असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. तर यापुढे आमची, महाराष्ट्राची, पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात येता येणार नाही, हे आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी ट्विटरवर पत्रक जारी करुन आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.
देशात यूपीतल्या मजुरांच्या घरवापसीमध्ये आलेल्या अडचणींवरुन योगी सरकारने म्हटलं की, "कोणत्याही राज्याला यूपीच्या मजुरांची सेवा घेण्याआधी आता यूपी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल." या निर्णयानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रक जारी करुन परवानगीशिवाय मजुरांना महाराष्ट्रात येता येणार नाही, असं म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावे लागेल असे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असे तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं.
तसंच महाराष्ट्र राज्य सरकारने ह्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिते तर महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा.
योगी सरकारचा नियम काय?
याआधी योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, "कोणतंही राज्य सरकार परवानगीशिवाय उत्तर प्रदेशातील लोकांना कामगार किंवा मजूर म्हणून घेऊन जाणार नाही. ज्याप्रकारे लॉकाडाऊनदरम्यान उत्तर प्रदेशच्या स्थलांतरित मजूर आणि कामगारांची अवस्था झाली आणि ज्याप्रकारे त्यांच्यासोबत वर्तणूक केली ते पाहत उत्तर प्रदेश सरकार त्यांच्या सामाजिक सुरक्षेची हमी आपल्या हाती घेणार आहे. स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशशिवाय देश किंवा जगात कुठेही गेले तरी सरकार त्यांच्यासोबत असेल."
Raj Thackeray | ... तर यूपीच्या कामगारांना राज्यात येण्यास परवानगी घ्यावी लागेल; राज ठाकरे यांचा योगी सरकारवर निशाणा