Mahashivratri 2022 : आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीचा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. मुंबईत प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातही आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरात मोठी गर्दी केली होती. 


महाशिवरात्रीचा एक पवित्र सण जो देशभरात अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो. मात्र, देशासह राज्यावर गेल्या दोन वर्षासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे भाविकांसाठी मुंबईतील प्राचीन बाबूलनाथ मंदिर पूर्णपणे बंद करण्यात आले होते. भाविकांसाठी दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध देखील शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर आज महाशिवरात्रि निमित्ताने बाबूलनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, दर्शनासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून भाविकांनी बाबुलनाथ मंदिरात दर्शन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर भाविकांना मंदिरात दर्शन भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 


बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सुप्रसिद्ध शिवमंदिर असून, राजा भीमदेव यांनी हे मंदिर 12 व्या शतकात बांधले आहे. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते, मात्र, 1780 साली मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.


व्रत पद्धत आणि विधी


महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे.  बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी.  शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.