Sanjay Raut: तुरुंगातून  बाहेर आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटाला टोला लगावला आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटणार असून सरकार तेच चालवत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारने काही निर्णय चांगले घेतले असून विरोधाला विरोध करणार नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. तीन महिन्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लोकांनी स्वागत केले, प्रेम व्यक्त केले. लोक मला विसरली असतील असे वाटले होते. मात्र, त्यांनी लोकांचे आभार मानले.


संजय राऊत यांची बुधवारी संध्याकाळी तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी करणार नाही. कोर्टाच्या आदेशाने देशात मोठा संदेश गेला आहे. माझ्या मनात कोणाविरोधात राग नाही. माझ्याविरोधात कारस्थान करणाऱ्यांना आनंद वाटत असेल तर त्यांच्या आनंदात सहभागी आहे असेही त्यांनी म्हटले. या सरकारला विरोधाला विरोध करणार नाही. काही निर्णय चांगले घेतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हाडाला परत अधिकार दिले आहेत. आमच्या सरकारने हे अधिकार काढले होते. असे काही चांगले निर्णय सरकारने घेतले असल्याचे सांगत राज्य सरकार उपमुख्यमंत्री चालवत असल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कटुता संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याचेदेखील स्वागत करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. 


ठाकरे, पवार आणि फडणवीसांना भेटणार


संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. पवारांसोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांचीही भेट घेणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. येत्या काही दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. 


पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार 


पंतप्रधान हे देशाचे असतात, एका कोणत्याही पक्षाचे नसतात. मी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून आपल्यासोबत काय घडले, कारस्थान कसे रचले गेले याची माहिती देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.


कारागृहात एकाकीपण 


संजय राऊत यांनी कारागृहात एकाकीपण येत असल्याचे सांगितले. कारागृहात एकाकीपणा वाढतो. कारागृहात भितींशी बोलावे लागते असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीत, आणीबाणीत अनेकजण तुरुंगात गेले होते. राजकीय आयुष्यात तुरुंगात जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 


पाहा व्हिडिओ: शिवसेना नेते संजय राऊत यांची संपूर्ण पत्रकार परिषद