मुंबई :  मुंबईकरांना लवकरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) आता सिंहसुद्धा पाहायला मिळणार आहे. गुजरातमधील सिंहाची जोडी (Gujrat Lion)  नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ही  माहिती दिली आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयाच्या वतीनं  सिंहाची नर-मादी जोडी देण्यात  येणार आहे. सिहांच्या या जोडप्याची भर पडल्यानं  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान वाढणार आहे


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे 12 हेक्टर कुंपण क्षेत्रात क्षेत्रात 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात वाढ देखील झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात 17 वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला. दरम्यान वन मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुजरात राज्यातील ही सिंहाची जोडी येणार असल्याने उद्यानात पर्यटकांची संख्या पुन्हा वाढणार आहे.


70 वर्षांनंतर चित्ते भारतात!


तब्बल 70 वर्षांनंतर भारत देशात चित्ते परतले आहेत. यापूर्वी 1952 मध्ये देशातून चित्ताची प्रजात नष्ट झाली होती. भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात पुन्हा चित्ते आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्तासाठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :