Raj Thackarey and CM Shinde Meet: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं रोज बदलताना दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यातच आता कोणत्या आणखी कोणत्या नव्या समीकरणांची नांदी तर होणार नाही ना हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackarey) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. एकीकडे मनसेच्या बैठकीत ठाकरे गटासोबतच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला असताना राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची घेतलेल्या भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती सध्या मिळत आहे. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद अवघ्या महाराष्ट्रातून घालण्यात येत असल्याचं चित्र सध्या आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दादर, शिवसेना भवन, कल्याण, डोंबिवली भागामध्ये अशा आशयाचे बॅनर देखील लावण्यात आले होते.पण आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या वर्षभरापासून राज ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला. गेल्या वर्षभरात अनेक वेळा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. पण केवळ सदिच्छा भेट असल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतिर्थावर जाऊन त्यांच्या घरातील बप्पाचे देखील दर्शन घेतलं होतं. पण तेव्हाही कोणतीही राजकीय भेट नसल्याचं दोघांनी स्पष्ट केलं होतं. 


 सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय महानाट्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ही कोणती राजकीय भेट होती की या भेटीमागे काही वेगळी कारणं आहेत हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. पण या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत कोणते नवे बदल होणार की आणखी नवी समीकरणं पाहायला मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा :