Uddhav Thackeray Prakash Ambedkar Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणे जुळवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या थिंक टँकने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मित्र जोडण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत (Vanchit Bahujan Aaghadi) आता शिवसेना ठाकरे गटाची आघाडीसाठी चर्चा सुरू झाली आहे. राजकारण-समाजकारणातील ठाकरे आणि आंबेडकरांची तिसरी पिढी राज्यात बदल घडवेल का, याकडे लक्ष लागले आहे. 


शिवसेना आणि वंचित आघाडीची युती ही शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून होणार की महाविकास आघाडीतील पक्ष म्हणून होणार आहे, याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. मात्र, शिवशक्ती भीमशक्ती प्रयोगाचा राज्याच्या राजकारणावर नेमका परिणाम कसा होणार? याची आताच चर्चा सुरू झाली आहे. शिवशक्ती भीमशक्ती तसा फॉर्म्युला जुनाच असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत अर्जुन डांगळे यांनी म्हटले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि नंतरच्या काळातदेखील अशी युती झाली असल्याचे अर्जुन डांगळे यांनी म्हटले. प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा आंदोलनात सहभाग घेतला होता, असेही त्यांनी सांगितले. 


आंबेडकर-ठाकरे कधी एकत्र?


प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधारणा चळवळीत काम करत होते. विशेषतः संयुक्त महाराष्ट्र आंदोलन झालं तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना नेतृत्व करण्याची विनंती केली होती.  त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केलं. त्यानुसार सगळे पक्ष एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. शेड्युल कास्ट त्यानंतर रिपब्लिकन पक्ष हा संयुक्त महाराष्ट्र समितीत स्थापन झाला असल्याचे अर्जुन डांगळे यांनी सांगितले. 


त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या युतीचे उमेदवार जे.पी. घाटगे हे भांडूपमधून निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देताना नामदेव ढसाळ आणि भाई संगारे यांच्यासोबत युती केली होती. त्यानंतर रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत युती केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्याने रामदास आठवले हे भाजपसोबत गेले. तर, अर्जुन डांगळे आणि काहीजण गट शिवसेनेसोबत राहिले. 


अर्जुन डांगळे यांनी संभाव्य शिवसेना ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत असतील तर चांगला प्रयोग या निमित्तानं होईल. यामुळे राजकीय ताकद वाढेल. प्रकाश आंबेडकर यांना विदर्भ मराठवाड्यात मोठा वर्ग मानणारा असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले नसल्याचेही डांगळे यांनी म्हटले. ठाकरे यांचे हिंदुत्व व्यापक आणि सर्वसमावेशक असून शेंडी-जानवं हे त्यांचे हिंदुत्व नसल्याचेही अर्जुन डांगळे यांनी म्हटले. 


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे समीकरण जुळून आले तर नक्कीच त्याचा फायदा होणार असल्याचे डांगळे यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीसुद्धा आघाडीत वंचितसाठी सकारात्मक असतील या पक्षाच्या फारशा विचारधारा वेगळ्या नाहीत. काही मुद्यांवर काही असहमती असेल तर समान किमान कार्यक्रम आखला जाईल, असेही डांगळे यांनी म्हटले. भाजपला हरविण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घेतली जात असेल तर नक्कीच महत्वाची ठरेल असेही त्यांनी म्हटले. या आघाडीचा फायदा महाराष्ट्राला आणि विशेषत: वंचित घटकांना होईल असा विश्वास डांगळे यांनी व्यक्त केला.  


वैचारिक नव्हे तर राजकीय आघाडी


शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी ही  राजकीय आघाडी असून वैचारिक राजकारण कधीच मागे पडले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. शिवसेनेने एकीकडे संभाजी ब्रिगेड आणि दुसरीकडे वंचित असे दोन्ही विचाराच्या पक्षाला सोबत घेतले आहे. या दोन्हींना ही ते मान्य आहे, मात्र त्याचा फायदा वंचितला किती होते हे बघणे महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. 


उत्तम कांबळे यांनी म्हटले की, भीमशक्तीचे विभाजन झाले आहे. तर, शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर झालेल्या आऊटगोईंगचा फटका बसला आहे. भाजपसोबत रामदास आठवले असून डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासारखे विचारवंत आहेत. त्यामुळे भीमशक्ती ही एकत्रितपणे कुठंच नसल्याकडे कांबळे यांनी लक्ष वेधले. 


शिवसेना आणि हार्डकोअर हिंदुत्व यांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. हार्डकोअर हिंदुत्व हा संघ परिवाराचा आहे. शिवसेनेचा अजेंडा हा प्रत्येक निवडणुकीनुसार बदलतो याकडेही उत्तम कांबळे यांनी म्हटले. शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली तरी त्यातून मोठा बदल होईल असे होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात काही मुद्यांवर परस्परविरोधी भूमिका असल्याकडे उत्तम कांबळे यांनी लक्ष वेधले.