Shivsena-VBA Alliance: राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या प्रयोगाची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यातील बैठक संपली आहे. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. मुंबईतील 'ग्रॅण्ड हयात' मध्ये ही बैठक सुरू होती. आगामी मुंबई महापालिका (BMC Election) आणि इतर महापालिका निवडणुकीतील आघाडीच्या अनुषंगाने ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अशा प्रकारची बैठक होणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीच्या अनुषंगाने पहिली बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तर, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, सुजात आंबडेकर आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे उपस्थित होते. सुजात आंबेडकर यांनी आपण बैठकीत उपस्थित नसल्याचे म्हटले.
या मुद्यांवर चर्चा?
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता नवीन राजकीय समीकरणे मांडण्यांचा प्रयत्न होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जागा वाटपाबाबत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजीदेखील उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय करणार?
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्यानंतर काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव पाठवला होता. तर, राष्ट्रवादीवर टीका केली होती. आता शिवसेनेसोबत जुळवून घेताना महाविकास आघाडीतील चौथा घटक पक्ष की शिवसेनेचा मित्र पक्ष असणार, ही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. या बैठकीत या मुद्यावरही चर्चा झाल्याचे समजते.
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आंबेडकर यांनी आज बैठक होणार नसल्याचे म्हटले होते. शिवसेना ठाकरे गटासोबत आपली चर्चा सुरू असून सकारात्मक चर्चा होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. शिवसेना ठाकरे गटासोबत ज्यावेळी होईल, त्यावेळी त्याची माहिती दिली जाईल असेही त्यांनी सांगितले होते.