Navi Mumbai Crime : विवाहितेने आपल्या पाच वर्षीय मुलासह इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नवी मुंबईतील (Navi Mumbai) कोपरखैरणे (Koparkhairane) इथे उघडकीस आली आहे. या घटनेत विवाहितेचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरती विजेंद्र मल्होत्रा असं मृत विवाहितेचं नाव आहे. सासरच्याकडील मंडळींच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचललं. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली असून विवाहितेच्या सास आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे आरतीने मागील वर्षी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला सासरच्यांनी वाचवलं होतं.
आरती विजेंद्र मल्होत्राचा विवाह जानेवारी 2016 मध्ये झाला होता. ऑनलाईन मॅट्रिमोनी साईटवरुन आरती आणि विजेंद्र यांची ओळख झाली आणि ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतर आरती पती सासु-सासरे आणि नणंद या सगळ्यांसह कोपरखैरणे सेक्टर-20 मधील श्री रावेची अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर राहत होती. 2017 मध्ये आरती आणि विजेंद्र यांना मुलगा झाला. विजेंद्र मल्होत्रा हा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करतो.
बहिणीला आमच्याशी बोलू देत नव्हते, भावाची पोलिसात तक्रार
लग्नानंतर काही वर्ष चांगली होती. पण त्यानंतर सासरकडील मंडळीनी आरतीचा छोट्या गोष्टींवरुन शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. शिवाय ते आम्हाला तिला भेटू देत नव्हते की तिला आमच्यासोबत फोनवर बोलू देत नव्हते. यंदाच्या दिवाळीला जेव्हा आम्ही तिला आणि भाच्याला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मिठाई आणि भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय माझ्या बहिणीला आम्हाला भेटूही दिलं नाही. सोमवारी (5 डिसेंबर) सासू आणि नणंदने आरतीला तिच्या मुलापासून दूर ठेऊन घराबाहेर जाण्यास सांगितलं. यामुळे आरतीने हे टोकाचे पाऊल उचललं, अशी तक्रार आरतीच्या भावाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात केली. भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरतीच्या पतीसह सासू आणि नणंदेविरोधात छळवणुकीसह आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.
"आई रडत देवाकडे जायचंय बोलत होती," मुलाची पोलिसांना माहिती
5 डिसेंबरला विशालला दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेंद्रचा कॉल आला. आरतीने मुलासह गच्चीवरुन उडी मारल्याचं त्याने सांगितलं. कुटुंबियांनी दोघांना कोपरखैरणेतील स्नेहदीप रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तर मुलाला आयसीयूमध्ये दाखल केलं. या घटनेत मुलाच्या चेहरा, हात आणि पायांना दुखापत झाली आहे. "आई रडत होती, देवाकडे जायचं आहे असं बोलत होती. आम्ही गच्चीवर गेलो आणि तिथून उडी मारली," असं मुलाने पोलीस आणि आरतीच्या कुटुंबियांना सांगितलं.
पतीला अटक, सासू आणि नणंदेला नोटीस
कोपरखैरणे पोलिसांनी आरतीचा पती विजेंद्र मल्होत्रा, सासू किरण मल्होत्रा आणि बहिण अंजली मल्होत्रा यांच्याविरोधात भादंवि कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 498 A (पती आणि कुटुंबियांकडून महिलेचा छळ) आणि 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
सहा वर्षांपासून छळ सुरु होता. 5 डिसेंबर रोजी चणे उकडण्यावरुन वादाची ठिणगी पडली आणि आरतीने हे कृत्य केलं. आम्ही तिच्या पतीला अटक केली असून इतरांना नोटीस बजावली आहे, असं कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठी पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी सांगितलं.