Shivsena-VBA Alliance: राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत (Vanchin Bahujan Aaghadi Alliance With Shivsena Thackeray Faction) युती करण्याची घोषणा केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


रेखा ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठका सकारात्मक झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी होकार कळवला असल्याची माहिती त्यांनी दिली. 


रेखा ठाकूर यांनी म्हटले की, शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असून युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीत समाविष्ट करून चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार हे शिवसेनेने स्पष्ट करावे अशी मागणीदेखील वंचितकडून करण्यात आली आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल असेही रेखा ठाकूर यांनी म्हटले. त्यामुळे आता वंचितने आता युतीबाबतच्या निर्णयाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला आहे. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व वैदिक नसून ते मान्य असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. शिवसेनेसोबत युती करण्यासाठी काहीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याला अर्पण करण्यात आलेली, प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: