Maharashtra Politics Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुलाखतीत भाजपवर केलेल्या आरोपांना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी  प्रत्युत्तर दिले आहे. विश्वासघाताचा पहिला अंक शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचा आरोप शेलार यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा असे आव्हान शेलार यांनी दिले.


शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान शिवसेना नेतृत्वाकडून दिले जात आहे. आज प्रकाशित झालेल्या मुलाखतीत ही उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले आहे. यावर टीका करताना शेलार यांनी म्हटले की, राज्यातील जनता याला भुलणार नाही. निवडणुकीला सामोरे जायचे असतील तर तु्म्हाला आधीच राजीनामा द्यावा लागेल असेही शेलार यांनी म्हटले. आता आमच्यासोबत 40 आमदार आले आहेत. त्यांनी युतीसोबत मते मिळवली आहेत. तुमच्यासोबत असलेल्या 12 ते 13 आमदारांनी राजीनामे द्यावे आणि दोन हात करावे असे चॅलेंज शेलार यांनी शिवसेना नेतृत्वाला दिले. संघर्षाला भाजप कधी घाबरली नाही असेही त्यांनी म्हटले. 


एक दिवसासाठीही मुख्यमंत्री पद सोडले नाही


उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत आपल्या आजारपणात सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. उद्धव यांना सहानुभूती हवी आहे, त्यासाठी ते असे बोलत असल्याचे शेलार यांनी सांगितले. तुमची सत्तेची लालसा एवढी होती की, आजारी असताना एका दिवसासाठी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री पदाचा पदभार कुणाला दिला नसल्याची टीका शेलार यांनी केली. या आजारपणात  ममता बॅनर्जी यांना भेटत होते. शरद पवार यांच्यासोबत बैठका सुरू होत्या असेही शेलार यांनी म्हटले.


हा मुख्यमंत्र्यांचा अपमान 


राज्यातील मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही शेलार यांनी म्हटले. आता महाराष्ट्रद्रोह होत नाही का, हा राज्याचा अपमान नाही का, असा सवालही शेलार यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत बंडखोरांना पालापोचाळा म्हटले. त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली.