Uddhav Thackeray Interview : "परिवारातले समजून मी यांच्यावर अंधविश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. समजा मी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात," असा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांच्या अभूतपूर्व बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. या सर्व घडमोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच 'सामना'चे (Saamna) कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह भाजपवर जोरदार शाब्दिक वार केले. 


'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय'
मलाई खाण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदी नव्हतो. स्वतःकडे कोणतीही मोठी खाती ठेवली नव्हती. एका मंत्र्याने दिवा लावला म्हणून ते खातं माझ्याकडे आलं होतं," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार संजय राठोड यांना टोला लगावला. नक्की काय चुकलं, संजय राऊत यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "चूक माझी आहे. गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून त्यांच्या अंधविश्वास ठेवला. समजा मी यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेना प्रमुखांशी करत आहेत, असा आरोप करत सध्या सुरु आहे ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात."


...तेव्हा सत्तांतराच्या हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाहीत, असंही सांगण्यात आलं. मुलाखतीत शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. 'शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती,' असं त्यांनी सांगितलं. "काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या," असा मोठा आणि गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. शिवसेनेकडे आम्ही पक्ष नव्हे परिवार म्हणून पाहिलं. ज्यांना पक्ष संभाळायला दिला त्यांनीच विश्वासघात केला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


'चला उठा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू'
सामान्यातून आता असामान्य घडवण्याची वेळ आली. चला उठा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू. त्यांना मी ताकद दिली ही माझी चूक झाली. राजकारणात जन्म दिला त्यांना गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातकी आईलाच गिळायला निघाले आहेत. निष्ठा कधीच विकली जाऊ शकत नाही. ज्यांनी जन्म दिला त्यांनाच संपवायला निघाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.


संबंधित बातम्या