Maharashtra Politics BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा (Uddhav Thackeray Interview) पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले. ही मुलाखत म्हणजे ट्रेलर दणक्यात पण सिनेमा फ्लॉप असल्याची टीका शेलार यांनी केली. 


भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले की, विश्वविख्यात वाणीचे प्रवक्ते आणि दुरसे विस्कळीत झालेले नेते या दोघांच्या मुलाखतीपेक्षा टिझर बरा होता. या मुलाखतीवर आम्ही भाष्य केलेही नसते. पण सातत्याने भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला गेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार यांनी म्हटले की, ज्यावेळी मुख्यमंत्री व्हायचे होते तेव्हाही भाजपला इशारे देण्यात आले. मग मुख्यमंत्री पदावर बसले तेव्हाही भाजपला इशारे दिलेत आणि आता पायउतार व्हावे लागले तेव्हाही भाजपला इशारे दिले आहेत. इशारे आणि टोमणे मारल्यानंतर आपल्याला महत्त्व मिळेल यातून हे सगळं सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले. 


हा मुख्यमंत्र्यांचा अपमान 


राज्यातील मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही शेलार यांनी म्हटले. आता महाराष्ट्रद्रोह होत नाही का, हा राज्याचा अपमान नाही का, असा सवालही शेलार यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत बंडखोरांना पालापोचाळा म्हटले. त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली. 


एक दिवसासाठीही मुख्यमंत्री पद सोडले नाही


उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत आपल्या आजारपणात सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. उद्धव यांना सहानुभूती हवी आहे, त्यासाठी ते असे बोलत असल्याचे शेलार यांनी सांगितले. तुमची सत्तेची लालसा एवढी होती की, आजारी असताना एका दिवसासाठी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री पदाचा पदभार कुणाला दिला नसल्याची टीका शेलार यांनी केली. या आजारपणात  ममता बॅनर्जी यांना भेटत होते. शरद पवार यांच्यासोबत बैठका सुरू होत्या असेही शेलार यांनी म्हटले.