Maharashtra Omicron variant update in Cabinet Meeting : नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले. ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत.  


ओमिक्रॉनसंदर्भात नियमावलीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करुन निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीतील सूर 


ओमायक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत.  सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही.  सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे.  केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.  


परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असे सांगितले.


बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही


बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभाग निर्णय घेईल. तसेच बैठकीत सर्व मंत्र्यांचं म्हणणं आलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदर नियमावली बाबत चर्चा करावी. दुबईने 13 देशातील येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे तशाच प्रकरे महाराष्ट्रामध्ये देखील असावी याबाबत चर्चा झाली आहे. मंत्र्यानी याबाबत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी. मुख्यमंत्री यासंदर्भात पंतप्रधानांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सर्व विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशी सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना आणि स्थानिक प्रशासनाला केली आहे.  



महत्त्वाच्या बातम्या :