Coronavirus Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहेत. अशातच ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. हा व्हेरिएंट कोणत्याही प्रमुख सिंड्रोमच्या सौम्य आजाराचं कारण ठरत असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी सांगितलं. याशिवाय या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या म्युटेशनने तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, इजराईल, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी घातली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, ‘या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.’
अधिकाऱ्यांच्या मते, ओमिक्रॉनचं संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयात खूप कमी आहे. तसेच लसीकरण झालेल्या लोकांमध्ये याचं प्रमाण खूपच कमी आहे. पण लसीकरण न झालेल्या लोकांची प्रकृती वेगळी असू शकते.अधिकारी म्हणाले की, याबाबत दोन आठवड्यानंतरच नव्या व्हेरिएंटबाबतची अधिक माहिती मिळेल. हा व्हेरिएंट संक्रमित होऊ शकतो. मात्र हा व्हेरिएंट इतक्या वेगानं संक्रमित कसा होतोय, हे अद्याप समजलेलं नाही. याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत. पुढील काही दिवसांत याबाबतची अधिक माहिती मिळेल. सध्या काही रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. हे सर्व रुग्ण तरुण आहेत. त्यांचं सरासरी वय 40 इतकं आहे, असे कोएट्जी म्हणाल्या. काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या वाहतूकीवर बंदी घातली आहे. याबाबत कोएट्जी यांनी विरोध दर्शवलाय.
अतिशय वेगानं प्रसारीत होणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटला आटोक्यात आणण्यासाठी दक्षिण आफ्रिकामधील संशोधक संघर्ष करत आहेत. दक्षिण अफ्रीकामध्येच सर्वात आधी कोरोनाचा हा व्हेरिएंट मिळाला होता. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे इतर देशातीलही रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये दोन आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. शुक्रवारी दक्षिण अफ्रीकामध्ये ओमिक्रॉन संक्रमणाचे 2,828 नवीन रुग्ण आढळले. सोव्हिटोज बरगवनथ रुग्णालयातील आयसीयू प्रमुख रूडो मॅथिवा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या की, ‘ कोरोना रुग्णांच्या सामुहिक तपासण्यांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन दिसत आहे. 20 ते 30 वर्षांच्या तरुणांमध्ये मध्यम अथवा गंभीर स्वरुपात संक्रमित झाले असून उपचारासाठी दाखल झाले आहेत. काही रुग्णांची परिस्थिती जास्तच चिंताजनक आहे. यामधील जवळपास 65 टक्के रुग्णांनी लस घेतलेली नाही. उर्वरीत रुग्णांमध्ये काही एकच डोस घेतलाय. जसजशी रुग्णांची संख्या वाढत जाईल, तशी आरोग्य व्यवस्था चिंतेचा विषय होऊ शकते. ‘ सरकारी रुग्णालयात अधिक सोयी सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. वेळतच तयारी केल्यास मोठ्या नुकसान होण्यापासून वाचू, असेही रूडो मॅथिवा म्हणाल्या. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संक्रमणाचा दर 2 आहे. म्हणजेच प्रत्येक ओमिक्रॉन रुग्णांमुळे दोन जण संक्रमित होतात, असे प्राथमिक संशोधनातून समोर आलेय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha