Maharashtra Omicron update in Cabinet Meeting : नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभाग निर्णय घेईल. तसेच बैठकीत सर्व मंत्र्यांचं म्हणणं आलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदर नियमावली बाबत चर्चा करावी. दुबईने 13 देशातील येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे तशाच प्रकरे महाराष्ट्रामध्ये देखील असावी याबाबत चर्चा झाली आहे. मंत्र्यानी याबाबत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी. मुख्यमंत्री यासंदर्भात पंतप्रधानांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सर्व विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशी सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना आणि स्थानिक प्रशासनाला केली आहे. देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.


मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी सावध भूमिका 
मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत आज, 29 नोव्हेंबरला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसार आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.  मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे.  शिक्षण विभागाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतही सर्व शाळा सुरू होणार असल्याने आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळांसंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शाळा सुरु होणार का? सध्या तरी 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका
राज्यातील शाळा या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने या आधी घेतला होता. आता ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे योग्य ठरेल का यावर चर्चा करण्यात आली आहे. शाळा उघडण्याबाबत काही आव्हान आहेत त्यावर देखील यात चर्चा झाली. शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करुण निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय. त्यामुळे सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमीका घ्यावी असं या बैठकीत ठरल्याचं समजतंय. 


तिसऱ्या लाटेची तयारी?
राज्यात कदाचित तिसरी लाट आली तर त्याचा आढावा घेण्यासाठी बेड, मेडिसिन, ऑक्सिजनची तयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी केल्या आहेत. लसीकरणाच्या बाबतीत दिलेले टार्गेट, लसीकरणाच्या कार्यक्रमासमोरील नेमकी आव्हानं काय असतील यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.


केंद्राच्या राज्यांना सूचना
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत. राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.  सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवणे, त्यांनी मागील कालावधीत केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती, तपशील घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. संसर्गाची जोखीम असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांची तत्पर INSACOG लॅबमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात यावे, अशी सूचना राज्यांना देण्यात आली आहे. 



महत्त्वाच्या बातम्या :