Shivsena Slams Shinde Group : जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत अशा शब्दात शिवसेनेने शिंदे गटावर (Shinde Slams Shinde Group) बोचरी टीका केली आहे. खोके हराम गटाचे अस्तित्व फार काळ राहणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले. विधीमंडळ अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) शिवसेना, महाविकास आघाडीने शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. 


शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राज्यात यंदा पाऊसही तुफान झाला आहे, पण विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱ्यांवर आला असल्याचे शिवसेनेने म्हटले. 


त्यांच्या पिढ्यांना 'खोकेवाले' उपाधी लागणार


शिवसेनेने म्हटले की, विधीमंडळ अधिवेशनात खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण असल्याचे शिवसेनेने म्हटले. ही सल मनात टोचत असल्यामुळेच दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱयांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले असल्याचे 'सामना'ने म्हटले. 


शिंदेवर टीका 


विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोका आमदारांचे हे विचित्र चाळे मुख्यमंत्री स्वतः पाहत होते व त्यांनी या आमदारांना भल्याच्या चार गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण  आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? हाच प्रश्न आहे. त्या खोका आमदारांचा माकडखेळ पाहत आपले मुख्यमंत्री उभे राहिले व खोकेवाल्यांची कहाणी सफल झाली असल्याचा टोला शिवसेनेने लगावला. 


खोक्यांमुळे महाराष्ट्र बदनाम


महाराष्ट्रात व बाहेर जेथे जावे तेथे लोक खोकेवाल्यांच्या नावाने बोंब मारीत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. सर्वत्र खोकेवाल्यांचीच धामधूम आहे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा असेही शिवसेनेने म्हटले.