Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील (Munbai Pune Expressway Traffic) बोरघाटात वाहनांची मोठी रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा (Traffic Updates) लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंड, गणेशोत्सवानिमित्ताने गावाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे.  


गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. बुधवारी बाप्पाचे आगमन होणार आहे. त्याआधी आलेला विंकेडची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, विकेंड निमित्ताने मुंबई बाहेर जाणाऱ्यांच्या वाहनांची गर्दी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दिसून येत आहे. त्याच्या परिणामी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात वाहनांची रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहे. 


शुक्रवारी होता ट्राफिक ब्लॉक


शुक्रवारी मुंबई-पुणे महामार्गावर किवळे ते सोमटने या मार्गा दरम्यान दोन तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला होता. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉक दरम्यान एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी  ITMS (इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.


ITMS यंत्रणा आहे काय?


आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम होय. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39  ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत.