Kirit Somaiya: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) आता शिवसेनेतील विद्यमान नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात सोमय्या आक्रमक झाले आहेत. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या आज दापोलीत जात आहेत. सोमय्या यावेळी खेड ते दापोली असा पायी दौराही काढणार आहेत. 


राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. त्याशिवाय, या रिसॉर्ट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली होती. साई रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 


काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. परब यांचा रिसॉर्ट हा दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. पुढील आठवड्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. यामध्ये परब यांच्या रिसॉर्टच्या तोडक कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आज दापोली दौऱ्यासाठी सोमय्या हे ट्रेनने सकाळी 7.55 वाजता ठाण्याकडून खेडकडे रवाना झालेत. सकाळी 11.48 वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकात त्यांचे आगमन होणार होईल. खेड ते दापोलीपर्यंत ठिकठिकाणी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मुरुड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साई रिसॉर्टला सोमय्या भेट देणार आहेत. यावेळी काही अधिकारीदेखील असण्याची शक्यता आहे.


सोमय्यांचे आरोप काय?


अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते. 


साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. 


अनिल परब यांची ईडी चौकशी


शिवसेना नेते अनिल परब यांची दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी ईडीने चौकशी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री असताना अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आणि खासगी निवासस्थानी ईडीकडून मे महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परब यांची तीनदा ईडी चौकशी करण्यात आली होती. साई रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी याआधीच केला आहे.