Semiconductor : वेदांता समूहाने (Vedanta) तैवानमधील कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प (Semiconductor) गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यात यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात यावा यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले होते. राज्यात ही मोठी गुंतवणूक यावी यासाठी राज्य सरकारने वेदातां-फॉक्सकॉन समूहाला मोठी सवलत दिली असल्याचे समोर आले.
'मविआ'ने कोणती सवलत देऊ केली?
महाविकास आघाडी सरकारकडून 39 हजार कोटी रुपयांची सवलत देण्यात आली होती. सेमी कंडक्टरच्या प्रकल्पासाठी तळेगावमधली 400 एकर जागा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याशिवाय, या प्रकल्पासाठी देण्यात येणारी 700 एकर जागा ही 75 टक्के दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी 1200 मेगावॅटचा अखंडित वीज पुरवठा 20 वर्षांसाठी तीन रुपये प्रति युनिट दराने देण्यात येणार होता. या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वीस वर्ष दररोज 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार होता. पाणीपट्टीमध्ये 337 कोटी रुपयांची सूट देण्यात येणार होती. वीजेच्या दरात दहा वर्षांसाठी साडेसात टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वेदांता-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागा विचारपूर्वक देण्यात आली होती. या भागाचे वातावरण, कुशल मनुष्यबळ, पुरवठा साखळी अशा अनेक जमेच्या बाबी आहेत. त्याशिवाय, मुंबई-पुणे ही शहरेदेखील या प्रकल्पाच्या जवळ आहेत. त्याचा फायदा वेदांता-फॉक्सकॉनला झाला असता.
वेदांता ग्रुप महाराष्ट्रात आला असता तर काय फायदा?
सेमीकंडक्टर निर्मिती देशात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विशेष धोरण आखले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता सोबत झालेल्या चर्चेनुसार, सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता. तर, जवळपास 50 टक्के रोजगार हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती. वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रुपयाचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी होणार होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Semiconductor Gujarat: सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान?
- Semi Conductor Project : वेदांता-फॉक्सकॉनवरुन 'ब्लेम गेम'! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...