नवी मुंबई : नवी मुंबईतील दोन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांमधील वाद चव्हाट्यावर आला असून या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई बिल्डर असोसिएशन सल्लागार असलेले भूपेंद्र शहा यांनी बांधकाम व्यावसायिक उर्मेश उदाणी आणि इतर चार जणांवर जिवे ठार मारण्याची धमकी, व्यावसायिक बदनामी करणे, शिवीगाळ करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.


भुपेंद्र शहा यांनी भूमीराज हिल्स नावाचा गृहप्रकल्प बेलापूर येथील पारसिक हिल येथे सुरू केला आहे. या गृहसंकुलातील ग्राहकांना फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याची धमकी देवून केलेले बुकिंग रद्द करण्यासाठी भाग पाडणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिक उर्मेश उदाणी, उमेश पाटील, हेमंत घरत, के. कुमार , मनोज यादव यांचा समावेश आहे.


नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात जमीन संपादीत करण्यात आलेल्या जुगलकिशोर मुंदडा यांना सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेअंतर्गत बेलापूर येथे भूखंड मिळाले आहेत. मिळालेले भूखंड भूपेंद्र शहा यांना विकण्यात आले असून तसा रितसर करार सिडकोत करण्यात आला आहे.  या दहा हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर शहा यांनी 2016 मध्ये गृहसंकूल उभारण्यास घेतले आहे. यासाठी शहरात जाहिरातबाजी सुद्धा करण्यात आली आहे. या संकुलात घरे विकत घेणाऱ्या 9 लोकांना उर्मेश उदाणीसह इतर चार जणांनी नोटीसा पाठवल्या आहेत. हे गृहसंकुल वादग्रस्त आहे. घरे घेणाऱ्यांवर दिवाणी आणि फौजदारी कारवाई केली जाईल, या संकुलात आम्ही भागीदार आहोत अशा आशयाच्या नोटिसा दिलेल्या आहेत. यामुळे शहा यांची बदनामी झाली असून घरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. या प्रकरणी शहा यांनी न्यायालयात दाद मागितली असता नाहक बदनामी करणाऱ्या पाच जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बांधकाम व्यावसायिक भुपेंद्र शहा आणि उर्मेश उदाणी यांच्यात व्यावसायावरून वाद सुरू आहेत. शहा यांनी विकत घेतलेल्या या भूखंडाच्या विरोधात आतापर्यंत बेलापूर न्यायालयात 25 दावे दाखल करण्यात आले आहेत. यातील 18 दावे न्यायालयाने फेटाळले असल्याचे शहा यांनी पोलीस तक्रारीत म्हंटले आहे. संबंधीत गृहप्रकल्पाची माहिती महारेराकडे देण्यात आलेली आहे. यानंतर ग्राहकांनी घरे बुकिंग केले आहेत. यावरून उमेश उदाणी आणि इतर चार जणांनी अनेक मध्यस्थीतर्फे आपल्याला पाच कोटींची खंडणी मागितली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या :


पायाभूत सुविधा आणि घरांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्प सकारात्मक, घरे स्वस्त होण्याचा जाणकारांचा अंदाज