Mumbai Rain :  मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे.  पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाल्यानं पाण्याचा निचरा झाला.  पाण्याचा निचरा झाल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नागरिकांना आता सबवेचा वापर करता येणार आहे. 


मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर चेंबूर पूर्व येथील नीलम जंक्शन येथे पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तसेच ठाकर बाप्पा कॉलनी, चेंबूर येथे पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दक्षिण मुंबई अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने जोर पकडला असला तरी सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला या सेक्शन  या भागातील ट्रेन सुरू आहेत.






पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गासह इतर रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आणि मुंबईकरांचा ठिकठिकाणी गाडय़ांमध्येच खोळंबा झाला. काही सखल भागांत अनेक घरे आणि दुकानांमध्येही पाणी घुसले. यात अनेकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. धो-धो पाऊस सुरूच राहिल्यामुळे पाणी ओसरण्यास वेळ लागला.   






शुक्रवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सांताक्रुझमध्ये  51.2 मिमी, तर कुलाब्यात 28.2  मिमी, ठाण्यात 61  मिमी पावसाची नोंद झाली.  शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तसेच काही घरांचीही पडझड झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने दादर-हिंदमाता, अंधेरी सब वे आदी अनेक परिसरांत पाणी भरले. पालघर जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर, मनोर, डहाणू, बोईसर, जव्हार, तलासरी, कासा भागात जोरदार पाऊस सुरू असून मनोर, चिंचणी भागात रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पावसाची रीपरिप अधून मधून जोरदार पावसाच्या सरी आहेत.