Maharashtra Rain Update : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावलीय. मुंबई आणि उपनगर परिसरात (Mumbai Rain)  जोरदार पाऊस सुरु आहे. पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा असल्यानं चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईतही आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पुन्हा पावसाचा जोर राहणार आहे.


पुढील पाच दिवस मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल मुंबई काही ठिकाणी अतिवृष्टी, भायखळा आणि कुलाब्यात 200  मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.  204 मिमीहून अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी म्हटले जात असते. काल मुंबईत रेड अलर्ट होता. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाल्यानं पाण्याचा निचरा झाला. मात्र पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  तीन ते चार फूट पाणी साचल्याने मुंबईतील अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीसह पुणे, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.  


मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे.  विदर्भातही आज काही ठिकाणी चांगला पाऊस अपेक्षित आहे.


काल झालेल्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे.  तर अधून मधून जोरदार पाऊस आहे. काल दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे.  वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली.  यामुळे  पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे.