मुंबई : एबीपी माझाने मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची दुरावस्था दाखवल्यानंतर त्याची दखल उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतली आहे. आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात जाऊन खराब झालेल्या पुस्तकांची पाहणी केली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पंचवीस वर्षे जुन्या असलेल्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात हजारो पुस्तकांचे नुकसान झाला आहे. अनेक पुस्तकांना वाळवी लागली आहे, तर अनेक पुस्तकांची दोन तुकडे झाले आहेत, मोठ्या संख्येने पुस्तके रद्दीत दिली जाताय. याच ग्रंथालयातील दुरवस्थेबाबत एबीपी माझाने बातमी समोर आणून या ग्रंथसंपदेला जतन करण्यासंदर्भात आवाहन सुद्धा केलं आहे


या सगळ्याची दखल घेऊन मुंबई विद्यापीठ ग्रंथालय दुरावस्थेची प्रत्यक्ष पाहणी मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठातील युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत,वैभव थोरात, राजन कोळंबेकर यांच्यासोबत जाऊन केली. या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी महापालिका अधिकारी,मुंबई प्राधिकरण अधिकारी,विद्यापीठ अधिकारी आणि तत्सम अधिकाऱ्यांसह महत्वाची बैठक कालिना कॅम्पस येथे 2 मार्च रोजी घेतली जाणार आहे


या बैठकीनंतर मागील दोन वर्षापासून तयार असलेल्या नव्या ग्रंथालयाच्या इमारतीत ही सर्व पुस्तके स्थलांतरित करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे कारण नवीन ग्रंथालयाची इमारतीसाठी 22 ते 25 कोटी रुपयांचा खर्च केला असून इमारत तयार असतानासुद्धा अशाप्रकारे या पुस्तकांचे नुकसान झाल्यानंतर या सगळ्याला विद्यापीठ प्रशासनाला जबाबदार धरले जात आहे, त्यामुळे या बैठकीनंतर तसेच सर्व पुस्तके नव्या इमारतीत कधी स्थलांतरित होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, जेणेकरून उरलेली लाखो पुस्तके सुरक्षित राहतील आणि त्यांचे जतन भविष्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले जाईल.


विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही 1975 ला तयार करण्यात आली होती. या ज्ञान स्त्रोत केंद्राची (विद्यापीठ ग्रंथालय) ग्रंथ संपदा 7,80,000 एवढी आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिलेली होती. तसेच काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत.


संबंधित बातम्या :


मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा! ग्रंथालयातील हजारो पुस्तकं खराब, रद्दीत जमा!