University Of Mumbai : मुंबईच्या कलिना विद्यापीठात ग्रंथालयाच्या आतील दुर्दशा पाहिली तर लक्षात येईल, मागील साठ-सत्तर वर्षांपासून जपलेल्या दुर्मिळ पुस्तकांचा विद्यापीठाच्या ग्रंथालयतील खजिना पूर्णपणे खराब झालाय. हजारो पुस्तक पूर्णपणे खराब झालीये, काही पुस्तकांना वाळवी लागली आहे, तर अनेक पुस्तकं रद्दीत जमा करण्याच्या वेळ आलीये.
ग्रंथालयातील मराठी भाषा विभाग हा मागील चार वर्षापासून पूर्णपणे बंद होता या मराठी पुस्तकांची अवस्था सुद्धा इतर पुस्तकाप्रमाणेच झालीये. यावर युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी विद्यापीठात ग्रंथालयाची दुरावस्था पाहून पुस्तकांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचं सांगून याबाबत विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने ग्रंथालयाचे सद्यस्थिती ग्रंथालयांमध्ये असलेल्या पुस्तकांच्या संदर्भात खुलासा केला आहे
विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही १९७५ ला तयार करण्यात आली होती. या ज्ञान स्त्रोत केंद्राची (विद्यापीठ ग्रंथालय) ग्रंथ संपदा ७,८०,००० एवढी आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिलेली होती. तसेच काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत.
या ग्रंथालयातील अनेक पुस्तके ही जीर्ण आणि कालबाह्य झालेली आहेत. जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करून रद्दबाबत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डीजीटायझेशन करण्याच्या उद्देश्याने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रीया लवकरच हाती घेण्यात येणार आहे. उपयोगी नसलेली पुस्तके रद्दीमध्ये काढण्यासाठी गोणीत भरली असून रद्दीत विकण्याची प्रक्रीयाही सुरु आहे.
या ग्रंथालय ईमारतीचे बांधकाम जुने असल्याने कालपरत्वे या इमारतीचे आयुमान कमी झाल्याने विद्यापीठाने या इमारतीचे सुरक्षिततेच्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट केले असून टप्प्या टप्प्याने कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर व प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी वेळोवेळी या ग्रंथालयाच्या इमारतीला भेटी देऊन कामाची पाहणी केली आहे. तसेच विद्यापीठ अभियंता, संबंधित कंत्राटदारांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच पुढे असेही नमूद करण्यात येते की, विद्यानगरी परिसरात नवीन ग्रंथालय इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून काही किरकोळ कामे व ओसी प्राप्त होताच मार्च अखेरीस नवीन ग्रंथालयाची इमारत वापरासाठी खूली होणार आहे.