मुंबई: एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची ठाण्यातील कोपरी पोलिसानी बुधवारी तब्बल आठ तास चौकशी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोपरी पोलीस ठाण्यात एका बारच्या परवान्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने ही चौकशी करण्यात आली. याबाबत माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे यांनी, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अधिक भाष्य करता येणार नसल्याचे सांगितले. तसेच यापुढेही चौकशीत सहकार्य करणार असल्याचे वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Continues below advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे यांनी 5 ते 6 पानी लेखी जबाब नोंदवला असून पोलिसांना देखील चौकशीत सहकार्य केले. पोलीस त्यांना पुन्हा चौकशीला बोलावू शकतात. तसेच गरज पडल्यास अटक देखील करू शकतात. मात्र हायकोर्टाच्या आदेशानुसार 28 फेब्रुवारी पर्यंत त्यांना अटक करता येणार नाही. 

काय आहे प्रकरण?समीर वानखेडे यांच्या मालकीचे नवी मुंबई येथील वाशी भागात सद्गुरु बार आणि रेस्टॉरंट आहे. वानखेडे यांनी बारचा परवाना 1997 साली काढला होता. परंतु त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्ष होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर विभागाने त्यांच्याकडून खुलासा मागविला होता. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाची सुनावणी होऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांचा बारचा परवाना रद्द करण्यात आला.

Continues below advertisement

दरम्यान,याप्रकरणी शनिवारी (19 फेब्रुवारी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वानखेडे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बारचा परवाना मिळविण्यासाठी वानखेडे यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता कोपरी पोलिसांकडून सुरू असून बुधवारी वानखेडे याची आठ तास चौकशी करण्यात आली.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha