मुंबई : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्यांच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या संघातील पूनम राऊत, स्मृती मानधना, मोना मेश्राम या महाराष्ट्राच्या तीन कन्यांनी दैदिप्यमान कामगिरी करुन, संपूर्ण जगाचं लक्ष्य आपल्याकडं वेधून घेतलं. त्यांच्या कामगिरीचा गौरव करत राज्य सरकारकडून 50 लाखाचं इनाम घोषित करण्यात आलं.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचा अभिनंदन प्रस्ताव विधानसभेत मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या तिघींच्या कामगिरीचा गौरव करत, प्रत्येकी 50 लाखांचं इनाम घोषित केलं.

मुख्यमंत्री आपल्या अभिनंदन प्रस्तावात म्हणाले की, ''भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक मालिकेतील कामगिरीमुळे संपूर्ण देशाची मान जगभरात उंचावली आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीचं सदनातर्फे अभिनंदन करतो. या संघातील महाराष्ट्राच्या तीन भगिनी पूनम राऊत, स्मृती मानधना, मोना मेश्राम या खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्राच्या या तिन्ही कन्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याची घोषणा करतो.''


दरम्यान, भारतीय महिला संघाने काल पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. यावेळी मोदींनी भारतीय महिला संघाचे कौतुक केलं होतं.