मुंबई: "एक शेतकरी म्हणून माझा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. समाजाने शेतकरी संपाला पाठिंबा द्यावा. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तशी त्यांची नियत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी" असं आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते मुंबईत बोलत होते.


यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध न ओतण्याचंही आवाहन केलं.

'शेतमालाची नासाडी नको'

“माझी विनंती आहे, आंदोलनात रस्त्यावर दूध ओतणं टाळावे. आक्रोश दाखवायचा असेल तर दूध गरीब मोहल्ल्यात वाटप करा. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही. त्याउलट गरिबांची सहानभूती मिळेल”, असं पवार म्हणाले.

'सरकारची नियत नाही'

“सामान्य माणसाला त्रास होईल, लोकांवर आघात होईल असं काही करु नये. पण हा संघर्ष प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, हा निकाल घ्यावा लागेल.  सरकारने दिलेली आश्वासन पाळली नाहीत,तशी त्यांची नियत दिसत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी असं आवाहन करतो”, असं पवारांनी नमूद केलं.

साम दाम दंड भेद

मुख्यमंत्र्यांनी पोटनिवडणुकीत पूर्णपणे साम-दाम-दंड-भेदची अंमलबजावणी केली.  सत्तेचा गैरवापर केला. बँका खुल्या ठेवणे याचा अर्थ सरळसरळ कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकायची. गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील 8-10 वर्ष निवडणुकीचे काम देऊ नये असा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने,केंद्राने जिल्हधिकाऱ्यांना शासकीय सेवेत ठेवता कामा नये.  त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. निवडणूक यंत्रणा, प्रशासन यंत्रणा मर्यादा सोडून वागता काम नये, अशी भूमिका घ्यायला हवी, असं पवार म्हणाले.

पालघरमध्ये भाजपविरोधात मतदान

पालघर पोटनिवडणुकीत भाजप जिंकली असली तरी, शिवसेना आणि  हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला मतं मिळाली. तर भाजपविरोधात बहुसंख्य मतदान झाल्याचं स्पष्ट झालं, असं पवारांनी नमूद केलं.

भाजपविरोधात एकत्र या

लोकशाहीवर विश्वास असलेल्या सगळ्यांनी, लोकमानस लक्षात ठेवून भाजप विरोधकांनी या परिस्थितीत एकत्र यावं, असं घडलं तर सगळ्यांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला आनंद होईल, असं पवारांनी सांगितलं.