Devendra Fadnavis : विरोधी पक्षात असताना बीडीडी चाळीतील पोलिसांना मोफत घरांची मागणी करणाऱ्या भाजपने या मुद्यावर यु-टर्न घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना 25 लाखांपेक्षा कमी दरात घरे देणार असल्याची घोषणा केली. मात्र, विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस मोफत घरांची मागणी करत या मुद्यावर आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांना मोफत घरे देण्याचे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ठरवले होते. तर, पोलिसांसाठी 50 लाखात घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. पोलिसांना मोफत घरे देण्याची मागणी करत मे महिन्यात वडाळा-नायगाव मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. पोलीसांना मोफत घरे द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, असे आव्हानच त्यांनी ठाकरे सरकारला दिले होते.
या उपोषणाच्या ठिकाणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भेट दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कोळंबकर यांचे उपोषण सोडवले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बीडीडी चाळीतील रहिवाशांप्रमाणे पोलिसांना घरे द्यावीत अशी आमची मागणी आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे पोलिसांनादेखील मोफत घरे दिली पाहिजे अशी आग्रही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. बांधकाम खर्च प्रति चौरस फूट 2000 रुपये पकडला तरी 10 लाखांहून अधिक खर्च येणार नाही. पोलिसांना मोफत घर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हटले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकारने 25 लाख रुपयांत घरे देणार असल्याचे जाहीर केले.
पाहा व्हिडिओ: कालिदास कोळंबकर यांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते?
आज विधानसभेत फडणवीसांनी काय घोषणा केली?
पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांपेक्षा कमी किंमतीत घर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केले. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलिसांना मोफत घरे द्यावी अशी मागणी कालिदास कोळंबकर यांनी केली होती. मीदेखील या मताचा होतो. मात्र, विभागाशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नाही. पोलिसांना मोफत घरे दिल्यानंतर शासकीय कर्मचारीदेखील हीच मागणी करतील आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करून बैठक घेणार आहे. त्यामुळे पोलिसांना 50 लाख नाही, 25 लाख नाही तर फक्त बांधकाम खर्च घेऊन ही घरे देणार आहोत. त्यातही सरकार अनुदान देईल. विशेष बाब म्हणून हा निर्णय घेत आहोत.
पाहा व्हिडिओ: पोलिसांना मोफत घर का नाही?
गिरणी कामगार घराची लॉटरी लवकरच
अनेक वर्षे रखडलेल्या गिरणी कामगार (Mumbai Mill Worker) घराची लॉटरी तात्काळ काढण्यात येणार आहे. 50 हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सफाई कर्मचाऱ्यांना मालकीचे घर देणार
मुंबई पालिकेतील (BMC) 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. दोन वर्षांपूर्वी कुणाच्या आदेशाने हा निर्णय रद्द केला माहिती नाही पण आम्ही त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे.