मुंबई :  मुंबईत स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे (Mumbai Police) स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे.  पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांपेक्षा कमी किंमतीत घर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षे रखडलेल्या गिरणी कामगारांना देखील लवकरच घर देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले आहे. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पूर्वी त्या घरांच्या किंमत 50 लाख ठरविण्यात आली होती. पण पोलिस बांधवांनी विनंती केल्यानंतर त्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे.  50  किंवा 25 लाख पोलिस बांधवांना परवडणार नाही त्यामुळे त्यापेक्षा कमी किंमतीत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीडीडी चाळीतील (BDD Chawl) नागरिकांना 500 चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या घोषणा


पत्राचाळीतील  नागरिकांना 25 हजार भाडे 


मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास (PatraChawl)  प्रकल्पातील नागरिकांना  25 हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


गिरणी कामगार घराची लॉटरी लवकरच


अनेक वर्षे रखडलेल्या गिरणी कामगार (Mumbai Mill Worker) घराची लॉटरी तात्काळ काढण्यात येणार आहे. 50 हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


सफाई कर्मचाऱ्यांना मालकीचे घर देणार


मुंबई पालिकेतील (BMC) 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे.  दोन वर्षांपूर्वी कुणाच्या आदेशाने हा निर्णय रद्द केला माहिती नाही पण आम्ही त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. 


शासकीय कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी वेतन मिळणार


राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी 29 ऑगस्ट रोजी (सोमवारी) पगार /निवृत्ती वेतन मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार पुढील महिन्यात एक सप्टेंबर रोजी होतो, हा पगार आता ऑगस्ट महिन्यातच 29 तारखेला होणार आहे.  दरम्यान, ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई वित्तीय नियम, 1959 मधील नियम 71 च्या तरतुदी तसेच कोषगार नियम 1968 च्या खंड 1 मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी शिथिल केल्या आहेत. 


महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः कंपन्या सुरू करतात आणि कंत्राट मिळवतात याची चौकशी केली जाणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. टाइम बॉण्ड पद्धतीने चौकशी पूर्ण करा असे पालिकेला सांगण्यात येईल. तसेच काही तक्रारी अशा आहेत ज्याची कॅगच्या माध्यमातून चौकशी केली जाईल.