Ganeshotsav 2022 : यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण यावर्षी कोणत्याही निर्बंधांशिवाय गणपती उत्सव (Ganpati Festival 2022) धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. तसंच यावेळी गणेश मूर्तींच्या (Ganesh Idol) उंचीवरही कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे आता विविध गणेश मंडळांमध्ये उंच मूर्तींची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती ही मुंबईच्या महाराजांची (Mumbaicha Maharaja) ठरली आहे. मुंबईतील खेतवाडीमध्ये ही मूर्ती साकारण्यात आली आहे.


परशुराम रुपी मुंबईच्या महाराजाच्या गणेश मूर्तीची उंची तब्बल 38 फुटांची आहे. दोन वर्षांमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीचे निर्बंध हटवल्यानंतर ही आतापर्यंतची सर्वात उंच गणेशमूर्ती यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. खेतवाडी गणेशोत्सव मंडळ हे उंच गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी हे प्रसिद्ध आहे. त्यामध्ये खेतवाडी अकरावी गल्ली, मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी ही उंच मूर्ती घडवली आहे


या मूर्तीच्या समोर गुरुकुलाचा देखावा साकारण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना उंचच उंच गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार आहेच शिवाय वेगवेगळे आकर्षक देखावे सुद्धा पाहायला मिळणार आहेत.


मुंबईच्या राजाची यंदा 22 फुटांची मूर्ती तर काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा
उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागमधील गणेशगल्लीच्या गणपतीचं यंदाची मूर्ती आणि सजावट आकर्षक असणार आहे. मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 95 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या मित्र मंडळाने यावर्षी काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा साकार केला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना लालबागचा राजा विश्वकर्मा रुपात पाहायला मिळणार असून भव्य अशी 22 फुटांची मूर्ती मुंबईच्या राजाची असणार आहे.


यंदा निर्बंधाशिवाय गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार
दोन वर्षानंतर कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर यंदा गणेशोत्सव निर्बंधांशिवाय साजरा होणार आहेत. यावर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसंच हमीपत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात. पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल. गणेशोत्सवासाठी राज्यभर एक नियमावली राहिल.