Mumbai Police:  मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरतीवरून विधिमंडळात मंगळवारी गदारोळ झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात कंत्राटी पोलीस भरतीवर भूमिका स्पष्ट केली. सध्या मुंबई पोलीस दलात हजारो जागा रिक्त आहेत. मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडूनच 3000 मनुष्यबळ प्रत्यक्ष पदभरतीचा कालावधी किंवा 11 महिने यापैकी जो कमी असेल त्याच कालावधीसाठी उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या सुरक्षा रक्षकांना कायदे विषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नसून ही तात्पुरती सोय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस दलाचे कोणत्याही परिस्थितीत कंत्राटीकरण करण्यात येणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की,  मुंबई पोलीस आयुक्त दलातील पोलीस शिपाई सवंर्गाची सुमारे 10 हजार पदे रिक्त आहेत. दरवर्षी वयोमानानुसार होणारी सेवानिवृत्ती, आंतर जिल्हाबदली आदी कारणांमुळे ही पदे रिक्त आहेत. दरवर्षी सुमारे 1500 पोलीस निवृत्त होतात. सन 2019 ,2020 आणि 2021 मध्ये पोलीस भरती झालेली नाही. अपघात, आजार यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले.  सुमारे 500 पोलिसांचा कोविडमुळे मृत्यु झालेला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठया प्रमाणावरील रिक्त पदांचा विचार करुन शासनाने संपूर्ण राज्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी 14 हजार 956 पोलीस शिपाई संवर्गातील पदे आणि 2174 पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदे तसेच एस.आर.पी.एफ (SRPF) ची पदे भरण्यास मंजूरी दिलेली असून एकूण 18, 331 पदांची पोलीस भरती प्रक्रीया सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 


मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7076 पोलीस शिपाई संवर्गातील पदे आणि पोलीस चालक संवर्गातील 994 पदे भरण्यात येणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी नमूद 7076 पदे भरल्यानंतरदेखील काही पदे रिक्त राहणार आहेत. मुंबई पोलीस दलासाठी 7076 पोलीस शिपाई पदे नियमित भरतीव्दारे भरण्याची कार्यवाही करण्यात येत असून, भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी पोलीस शिपाई उपलब्ध होण्याकरिता आणखी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या सर्व कारणांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाने 17 एप्रिल 2023 रोजी एका पत्राद्वारे 3000 मनुष्यबळ तूर्तास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. या 3000 कर्मचाऱ्यांकडून केवळ सुरक्षा विषयक कामकाज, गार्ड विषयक कर्तव्य, स्टॅटिक डयुटी करुन घेण्यात येणार असून कायदे विषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नाही, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 24 जुलै 2023 रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबई पोलीस दलासाठी देण्यात आलेले हे 3000 हे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील असून, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील नियमित पोलीस शिपाई पदे कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर या बाहययंत्रणेवरील मनुष्यबळाच्या सेवा संपुष्टात येतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जवानांमार्फत विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणे इ. करिता यापुर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आहे व वापरली जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: