Mumbai Police Recruitment : मुंबई पोलीस दलात (Mumbai Police Recruitment) कंत्राटी स्वरुपाची भरती होणार असल्याचं वृत्त एका वर्तमानपत्रानं दिलं होतं. हे वृत्त धादांत खोटे असल्याचं गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे.. पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होणारही नाही, असं या सूत्रांनी माझाला सांगितले. कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातून केली जाणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. विधिमंडळ अधिवेशनातही विरोधकांनी सरकारवर या मुद्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे.
राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने तीन हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत 289 अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात प्रखर विरोध दर्शविला होता.
विधिमंडळात आणि सर्वसामान्यांमध्येही पोलीस दलातील कंत्राटी भरतीच्या मुद्यावर नाराजी दिसून आली होती. याबाबत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पोलीस दलातील कंत्राटी भरतीबाबतचे वृत्त धादांत खोटे आहे. पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही आणि होणारही नाही, असेही उच्चपदस्थ सूत्रांनी 'एबीपी माझा'ला सांगितले.
गेल्या काळात पोलीस भरती न झाल्याने आणि मागील पोलीस आयुक्तांनी सुमारे 4500 पोलीस जिल्हा बदल्यांसाठी सोडल्याने मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. पोलीस शिपायांची सुमारे 10 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आली असून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते मिळण्यास विलंब लागतो, असंही गृह खात्यातील सूत्रांनी सांगितले.
काय होते वृत्त?
मुंबई पोलीस दलात नेहमी मनुष्यबळाची टंचाई असते. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पोलिसांची वेगवेगळ्या कारणासाठी गरज भासत असते. त्यामुळे मुंबई पोलीस दलात नव्याने भरती करण्याची विनंती पोलीस आयुक्तांनी गृहविभागाकडे केली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांची कंत्राटी पदभरतीसाठी गृहखात्याने निर्णय घेतला आहे. ज्यात मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई ते पोलीस सहाय्यक निरीक्षकांची 40 हजार 623 पदे मंजूर केली आहेत. तर मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या भागात दहीहंडी, गणेशोत्सव सारख्या महत्वाच्या सणांच्या काळात बंदोबस्तासाठी पोलिसांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे अशावेळी या कंत्राटी पोलिसांची मदत होणार आहे.