Mumbai Nashik Highway Traffic:  नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीवरून (Traffic Jam) विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला. भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांच्या उत्तरावर सभागृहाचे समाधान झाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आमदारांनी गोंधळ झालेला सुरुवात केली. आमदार जयकुमार रावल यांनी या विषयावर सभागृहातच चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर मंत्र्यांनी नोंद घेतो असे उत्तर दिले. त्यावर संतापलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरच परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.


बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक मुंबई वाहतूक कोंडीच्या संदर्भात सभागृहात आपण काल चर्चा केली. अध्यक्षांनी स्वतःही चर्चा गांभीर्यपूर्वक ऐकली त्यानंतर काही निर्देशही दिले. मात्र तरीही वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत तसूभर ही फरक पडायला तयार नाही. थोरात यांनी सभागृहात शाळकरी मुलांसोबत घडलेली घटना विशद केली. ते म्हणाले दुपारी बारा वाजता वाहतूक कोंडीत अडकलेली लहान लहान शाळकरी मुले सायंकाळी पाच वाजता वाहतूक कोंडीतून बाहेर पडली. हे अत्यंत चुकीचे आणि गंभीर असल्याचे थोरात यांनी म्हटले. 


संतप्त झालेले बाळासाहेब थोरात म्हणाले की, मंत्रीमहोदयांचे वाहतूक कोंडीबाबतचे गांभीर्य दिसले नाही. अध्यक्षांनी सूचना देऊनही, अंमलबजावणी झालेली नाही. मंत्री महोदयांनी या विषयाबाबत गंभीर होणे गरजेचे आहे. ‘नोंद घेतली‘ किंवा ‘होय‘ अशी उत्तरे देऊन चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले. 


भिवंडीत जुना आग्रा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी


जुना आग्रा मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली. चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत अनेक स्कूल बसदेखील अडकली होती. 30 मिनिटांचे अंतर कापण्यासाठी जवळपास तीन-तीन तास लागत होते. भिवंडी ते वसई आणि भिवंडी ते वाडा या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक वाहन जुना आग्रा मार्गाकडे वळली होती. मात्र, या मार्गावरही वाहतूक कोंडी दिसून आली. 


भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. जळगाव धुळे अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबई मध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 


इतर संबंधित बातम्या: