मुंबई :  जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेवरून सरकारवर टीका होत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जालन्यातील घटनाही ही खरोखर दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. लाठीचार्जमध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये अशी प्रकारची काळजी घेण्यात आली होती. जर लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. 


मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जालन्यातील उपोषणकर्त्यांसोबत स्वतः मुख्यमंत्र्यांची चर्चा केली होती. विविध प्रकारे सरकारचा त्यांच्याशी संवाद सुरू होता आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यावर चर्चा सुरू होती. मराठा आरक्षणावर सरकार काम करत असून आणि हा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय झाला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा एका दिवसात सुटणारा प्रश्न नाही. तो सोडवण्यासाठी सरकारचे बरेच प्रयत्न सुरू आहेत. 
काल, रात्री तिथे काही आंदोलनकर्ते उपोषण सोडायला तयार नव्हते. त्यांची तब्येत खराब होत होती. राज्य सरकारची जबाबदारी आहे की अशा प्रकारे जर आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असेल तर त्यांना घेऊन रुग्णालयात दाखल केले पाहिजे. आंदोलनस्थळावरील लोकांनी शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सरकारने भूमिका घेतली आणि प्रशासन आज पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. दुर्दैवाने आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असल्याचे फडणवीसांनी म्हटले. 


या दगडफेकीत जवळपास अधिकाऱ्यांसहित 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. मग त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज मध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारची काळजी घेण्यात आली. जर लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागला असते.


मी मुख्यमंत्री असताना तर मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मग हे सर्वोच्च न्यायालयांमध्ये ते आरक्षण का टिकला नाही याची सर्वांना कल्पना आहे. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः समिती तयार केलेली आहे ती त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि ज्या वेगवेगळ्या मागण्या आल्या त्यावर सुद्धा काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. म्हणून मला सर्वांना आवाहन करायचा आहे की मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर असल्यामुळे कोणीही कायदा आपल्या हाती घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.  


या संपूर्ण घटनेची चौकशी देखील केली जाणार असून कोणाचीही चूक असेल तर निश्चितपणे त्याच्यावर ही कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. सगळ्यांनी शांतता पाळण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले. राजकीय पक्षांनीदेखील वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ नये असेही फडणवीसांनी विरोधकांना म्हटले. 


इतर संबंधित बातमी :