मुंबई :  भाजप आणि एनडीएच्या विरोधात स्थापन झालेल्या विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची मुंबईतील बैठक पार पडली. मुंबईतील बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यासह महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील बैठकीत आघाडीने जागा वाटपावरही निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचे जागा वाटप राज्यनिहाय होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव मंजूर झाला.


'इंडिया' आघाडीच्या बैठकीत काय ठरलं?


मुंबईत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.  


- आम्ही 'इंडिया' आघाडीतील पक्ष, जेवढं शक्य होईल तेवढं, लोकसभा निवडणूक एकत्रपणे लढवतील. विविध राज्यातील जागा वाटपांच्या चर्चा तातडीने सुरू करण्यात याव्या. योग्य समन्वय, चर्चा करून करून जागा वाटप पूर्ण करावे. 


- इंडिया आघाडीतील सर्व पक्ष लोकांचे प्रश्न आणि त्यांच्याशी निगडीत महत्त्वाच्या मुद्यांवर देशातील विविध भागांमध्ये लवकरात लवकर जाहीर सभांचे आयोजन करावे. 


- इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये 'जुडेगा भारत, जीतेगा INDIA' या घोषवाक्यावर आधारीत प्रचार, मोहीम सुरू करण्यात यावी. 


आज आघाडीकडून समन्वय समिती, प्रचार समिती, संशोधन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत सहभागी पक्षांचे प्रतिनिधी असणार आहेत. 


पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल


इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत असताना संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले नाही. कोरोना काळात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही. आताच संसदेचे विशेष अधिवेशन कसे बोलावले? असा सवाल करताना खरगे यांनी देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोप केला. 


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सध्या जे केंद्रात आहेत त्यांचा पराभव होईल. त्यांनी मीडियाचा ताबा घेतला आहे. त्यांच्या फक्त बातम्या प्रसिद्ध होतात. ते पराभूत होताच, प्रेस देखील मुक्त होईल. मग तुम्हाला जे वाटेल ते लिहा. त्यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे, आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही तयार आहोत, वेळेपूर्वी निवडणुकाही होऊ शकतात.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इंडिया आघाडी मोदी सरकारच्या पतनास कारणीभूत ठरेल. त्यामुळे अनेक बड्या शक्ती इंडिया आघाडी मोडून काढण्यासाठी कारस्थान करत आहेत. आमच्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्यात भांडण नाही. आम्ही सर्व एकजूट आहोत, असेही केजरीवाल यांनी म्हटले. 


या व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्ष देशाच्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सांगितले. या एकजुटीमुळे भाजपचा पराभव निश्चित आहे. आता भाजपला विजय मिळणे अशक्य आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला.