CM Uddhav Thackeray : नवी मुंबईत उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन होतंय. खारघर इथं आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स विकसित करण्यात आलंय. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधन केलं. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी एक इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघसुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा व्हायला पाहिजे. या कार्यक्रमासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तकटरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, "आजचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री म्हटल्यानंतर राज्यासाठी काम करणं येतंच. पण हे रस्ते, पाणी आणि इतर कामे करत असताना आपण एका गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करतो, असं मला नेहमी वाटतं. जगावं कसं हेच आपण विसरून जातो. जगण्यासाठी खेळाची गरज आहे. हल्ली मैदानी खेळ मागे पडत चालले होते, त्यांना आपण प्रोत्साहन देत आहोत. आयटी क्षेत्रामध्ये विकास होत असताना आपण आपल्या मातीपासून दूरावत चाललो आहोत. त्यामुळे आता आपण ज्या मातीपासून आपलं नातं तुटतं चाललं होतं ते आता आपण पुन्हा जोडत आहोत."
"आपल्या पिढीमध्ये क्रिकेडचं वेड होतं. पण आता फुटबॉलचं प्रेम आणि आवड फार झपाट्यानं वाढत चालली आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हे वाढणारं वेळ ओळखून ही सुविधा निर्माण केली आहे. एखादी जागा मोकळी आहे, म्हटल्यावर पटकन तिथे विकासक येऊन टॉवर बांधून मोकळा झाला असता. पण तसं होऊ दिले नाही. मी म्हटल्याप्रमाणं आरोग्यदायी जीवनासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत." , असं मुख्यमंत्री म्हणाले.
"सगळ्या खेळांच्या सुविधा एका ठिकाणी उपलब्ध करुन देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. आमच्यावेळी गल्लीमध्ये क्रिकेट खेळाचे ते कधी मेन रोडवर आलंच नाही. माझ्या वेळेच्या अनेकांना वाटायचं की आपण क्रिकेटपटू व्हावं पण संधी नव्हती. मी स्वतः तेजस ठाकरे यांच्यासोबत परदेशातल्या फुटबॉल सामन्यासाठी गेलो होतो. त्यावेळी स्टेडियमध्ये मी आणि फक्त रेफरीचं (पंच) निष्पक्ष होतो. कारण मला आजही फुटबॉलमधलं काहीच कळत नाही. फुटबॉल हा पायानं खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये डोकं वापरावं लागतं. इतक्या वेगानं हा खेळ खेळावा लागतो आणि त्यासाठी वेगानंच विचार करावा लागतो. माझी इच्छा अशी आहे की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघसुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा व्हायला पाहिजे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची टीम कधी अर्धवट काम करणार नाही, याची मला खात्री आहे आणि त्या कामाला सरकार नुस्ती मदत नाही, तर प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. फुटबॉलमधलं जास्त काही कळत नसल्यामुळं उगाच काही अज्ञान प्रकट करु इच्छित नाही.", असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra School : राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
- वर्धा गर्भपात प्रकरण: डॉ. नीरज कदमला अटक, आतापर्यंत सहाजण ताब्यात, 12 कवट्या अन् 54 हाडं जप्त
- अमरावती, दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरुन राजकारण तापलं! नेमकं घडलंय तरी काय?
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा